

तासगाव शहर : तब्बल आठ वर्षांनंतर लागलेल्या तासगाव नगरपालिका निवडणुकीत माजी खासदार संजय पाटील यांना आपला गड शाबूत ठेवण्यात यश आले. कोणत्याही पक्षाचा पाठिंबा नसताना विकास आघाडी स्थापन करून केवळ कार्यकर्ता हाच माझा पक्ष असे म्हणून निवडणुकीत उतरलेल्या पाटील यांच्या शिलेदारांनी पालिकेवर आपला शिक्कामोर्तब करून थेट नगराध्यक्ष पदासह तेरा जागांवर निर्विवाद विजय मिळवला.
तासगाव नगरपालिका निवडणूक यंदा अतिशय अटीतटीने झाली. आमदार झाल्यानंतर रोहित पाटील यांची, तर माजी खासदार संजय पाटील यांची, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पहिलीच निवडणूक होती. प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची अशा ठरलेल्या या निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी पूर्ण ताकद पणाला लावली होती. पैशाचा पाऊस पडला. आश्वासने देण्यात आली. मात्र मतांचा घसरलेला टक्का आणि रोहित पाटील यांनी उमेदवारी देताना झालेला गोंधळ, यामुळे संजय पाटील यांच्या पथ्यावर ही निवडणूक पडणार, अशी परिस्थिती झाली होती.
दरम्यान, आमदार रोहित पाटील यांच्याशी फारकत घेऊन माजी नगराध्यक्ष अजय पाटील यांनी देखील आपल्या पत्नीची उमेदवारी अजित पवार राष्ट्रवादी गटातून दाखल केली. याचाही फटका रोहित पाटील यांना बसला. थेट नगराध्यक्ष पदासाठी स्वाभिमानी विकास आघाडीकडून विजया बाबासाो पाटील, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून वासंती बाळासाो सावंत, भाजपकडून विद्या सागर धाबुगडे, अजित पवार राष्ट्रवादीकडून ज्योती अजयकुमार पाटील आणि शिवसेनेकडून रंजना अंकुश चव्हाण मैदानात होते. यामध्ये विजया पाटील यांना 9 हजार 541 मते मिळाली, तर खालोखाल वासंती सावंत यांना 9 हजार 442 मते मिळाली. 99 मतांनी विजया पाटील यांचा विजय झाला.
अनेक मातब्बरांना धक्का...
दरम्यान, या निवडणुकीत अनेक मातब्बरांना जनतेने मतांच्या माध्यमातून धक्का दिला. यामध्ये प्रभाग तीनमधील स्वाभिमानी विकास आघाडीचे उमेदवार माजी नगराध्यक्ष जाफर मुजावर यांचा 329 मतांनी पराभव झाला, तर प्रभाग पाचमधील उमेदवार प्रा. मारुती पवार यांचा 31 मतांनी पराभव झाला. प्रभाग 7 मधील उमेदवार माजी नगराध्यक्ष अमोल शिंदे यांचा 333 मतांनी पराभव झाला.