

तासगाव : तासगाव नगरपालिका निवडणूक निकालाने स्थानिक राजकारणात अक्षरशः राजकीय भूकंप घडवून आणला आहे. नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांची निवडणूक लढणाऱ्या एकूण 93 उमेदवारांपैकी 43 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होणे, हा या निवडणुकीतील सर्वात धक्कादायक आणि राजकीय पक्षांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा निकाल ठरला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या 5 महिला उमेदवारांपैकी 3 उमेदवारांची, तर नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवलेल्या 88 उमेदवारांपैकी 40 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. ही आकडेवारी पाहता, मतदारांनी कोणत्या राजकीय प्रवृत्ती नाकारल्या आणि कोणत्या उमेदवारांवर अविश्वास दाखवला, हे स्पष्टपणे समोर येते.
राज्यात यशस्वी वाटचाल करणाऱ्या भाजपला तासगावमध्ये जबर धक्का बसला आहे. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला असताना, तासगाव नगरपालिका निवडणुकीचा निकाल भाजपसाठी लाजिरवाणा आणि इशारा देणारा ठरला आहे.
स्टार प्रचारक आणि सत्तेची ताकद असूनही स्थानिक पातळीवर अपयश येणे, हे पक्षातील अंतर्गत गटबाजी, उमेदवार निवडीतील चुकीचे निर्णय, तसेच स्थानिक नेतृत्वाकडे झालेल्या दुर्लक्षाचे फलित असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तासगाव नगरपालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदारांनी फारसा दिलासा दिलेला नाही. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योती अजयकुमार पाटील आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणारे आठ उमेदवार, अशा एकूण 9 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
स्थानिक अस्मितेचा मुद्दा जागृत करून सुध्दा राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळाले नाही. महाविकास आघाडीपासून फारकत घेऊन स्वतंत्रपणे मैदानात उतरलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षालाही तासगावात यश मिळवता आलेले नाही. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रंजना अंकुश चव्हाण यांच्यासह नगरसेवक पदासाठी लढणारे 5 उमेदवार, असे एकूण 6 उमेदवार अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत.
निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या मोजकीच असली तरी, मतदारांनी संजय पाटील यांचा पाठिंबा असलेले दोन अपक्ष सोडले, तर इतरांच्याबाबत मात्र कोणती तडजोड केलेली दिसत नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवणाऱ्या अपक्षांसह नगरसेवक पदासाठी निवडणूक लढणाऱ्या पाचपैकी तीन अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.