Municipal Council Election Result 2025: ईश्वरपुरात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम

मातब्बरांचा पराभव : विरोधकांची एकजूट असताना धोबीपछाड
Municipal Council Election Result 2025
Municipal Council Election Result 2025: ईश्वरपुरात विरोधकांचा करेक्ट कार्यक्रमPudhari Photo
Published on
Updated on
अशोक शिंदे, ईश्वरपूर

ईश्वरपूर पालिकेच्या निवडणुकीत अखेर आमदार जयंत पाटील सगळ्या मातब्बरांना पुरून उरले. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशा मातब्बरांसह सत्तास्थानावर असलेल्या सगळ्यांना ‌‘अकेला काफी है‌’, असा इशारा देऊन जयंतरावांनी तालुक्यातील साऱ्या विरोधी नेतेमंडळींना धोबीपछाड दिला. अर्थात त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला.

एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, स्थानिक विरोधी आमदार, तीन पक्षांचे जिल्हाध्यक्ष, स्वतः पालकमंत्री आणि या साऱ्याला जोडून केंद्रात-राज्यात सत्तास्थान; अशा साऱ्यांशी मुकाबला करण्याचे आव्हान एकट्या जयंतरावांसमोर होते. निवडणूक निकालानंतर हे आव्हान त्यांनी शहरवासीयांना विश्वासात घेऊन पेलल्याचे दिसले.

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे गट, रयत क्रांती या सर्वांची एकत्र मूठ बांधण्याचा प्रयत्न पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चांगला केला. परंतु प्रत्यक्षात एकीची वज्रमूठ बांधली गेल्याचे दिसले नाही. प्रत्येकजण आपापल्या उमेदवारांसाठी कार्यरत होता. माजी नगराध्यक्ष चिमण डांगे यांनी मात्र बंधू विश्वनाथ डांगे यांच्या विजयासाठी अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले.

शांत-सकारात्मक प्रचार...

प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला. सगळ्या विरोधकांकडून आरोप होत असताना, कोपरा आणि जाहीर सभांमधून आमदार जयंतराव मात्र आक्रमक होत नव्हते, तर आपण याआधी शहरासाठी केलेली विकास कामे आणि भविष्यातील ईश्वरपूर शहर... असा विधायकतेचा पाढा ते वाचत होते. शहरातील गुन्हेगारी-गुंडागर्दी यापुढे थांबली पाहिजे, असाही त्यांच्या भाषणाचा सूर होता. ईश्वरपूरच्या गांधी चौकात झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेपेक्षा आ. जयंतराव यांच्या यल्लमा चौकातील अखेरच्या सभेला तशी तुलनात्मक गर्दी कमी दिसत होती. याआधीप्रमाणे जयंतरावांकडे सभेतील, प्रचार फेऱ्यांतील गर्दी कमी, पण मतदानात आघाडी; असेच आजवरचे चित्र या निकालात देखील दिसून आले. मध्यंतरीच्या एका जाहीर मुलाखतीत त्यांनी म्हटल्याप्रमाणे... क्या बडा, तो दम बडा, हा त्यांचा पवित्रा पुन्हा अधोरेखित झाला.

दुचाकीवरचा नगराध्यक्ष; जयंतरावांइतकेच मताधिक्य!

केंद्रात आणि राज्यात सत्ता नाही, मग जयंतरावांकडे पालिका देऊन काय साध्य करणार; या निवडणूक प्रचारातील प्रमुख मुद्द्याला शहरातील मतदारांनी झुगारल्याचे दिसते. ईश्वरपूर विधानसभा निवडणुकीमध्येे जयंतरावांना ईश्वरपूर शहरात साधारणत: 7500 च्या आसपास मताधिक्य मिळाले होते. तोच करिष्मा या निकालात दिसला. नगराध्यक्षपदी विराजमान झालेल्या आनंदराव मलगुंडे यांनाही यादरम्यान 7329 मताधिक्य मिळाले.

आमचा नगराध्यक्ष स्कूटरवरून येईल, कोणीही हात केला तरी दुचाकी कुठेही थांबेल, लोकांचे म्हणणे ऐकले जाईल; असा जयंतरावांचा प्रचारातील मुद्दा देखील लोकांना भावला. आजवर शहरात जयंतरावांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांना मतदारांनी साद घातल्याचे दिसते. भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या विजय कुंभार यांचा अवघ्या 24 मतांनी झालेला पराभव मात्र जयंतरावांच्या गटाच्या जिव्हारी लागला. समाजाभिमुख कार्यरत राहिलेल्या महेश पाटील तसेच एल. एन. शहा यांनी मात्र जयंतरावांच्या गटाकडे अचानक येऊन बाजी मारली.

सत्तेची हवा अन्‌‍ एकीची बेकी...

पालकमंत्री पाटील यांच्यासह आमदार सदाभाऊ खोत, माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपाचे राहुल महाडिक, विक्रम पाटील, चिमण डांगे, संजय कोरे, जयवंत पाटील, राष्ट्रवादीचे केदार पाटील, वैभव पवार... अशी अनेक नेतेमंडळी आक्रमकतेने प्रचारात व्यस्त होती. गेल्यावेळच्या पालिका निवडणुकीमध्ये नानासाहेब महाडिक यांनी ज्या पद्धतीने साऱ्या विरोधकांना एकत्र करत रणनीतीने निवडणूक हाताळली होती, तसा प्रयत्न यावेळी झाला नसल्याचे दिसले. तिन्ही राजकीय पक्षांमधील मतभेदांची दरी, समन्वयाचा अभाव अधुनमधून जाणवत होता. सत्तेची नुसती हवा आणि सभेचे व्यासपीठ वगळता एकीचा मेळ प्रकटला नाही.

इकडे आ. जयंतरावांनी नगराध्यक्ष पदासाठी आनंदराव मलगुंडे यांचे नाव जाहीर करून पहिला डाव टाकला. भाजप - सेना युतीकडून मात्र नगराध्यक्ष पदाची उमेदवारी उशिरा जाहीर झाली. त्याला एकजुटीने लगेच प्रत्युत्तर देण्याचे त्यांना जमले नाही. इकडे जयंतरावांच्या गटाकडून एकापाठोपाठ प्रभागनिहाय उमेदवारी फारशी नाराजी न होता निश्चित होत असताना, भाजप, सेनेकडून जागा वाटपाचा तिढा अखेरपर्यंत सुटत नव्हता. भाजपात नव्याने आलेल्या माजी नगराध्यक्ष ॲड. चिमणभाऊ डांगे यांच्यासमोर सगळ्यांच्या एकीचे अंतर्गत आव्हान दिसत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news