

मिरज : गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असणारी व प्रतीक्षेत असणारी मुंबई ते बंगळूर स्लीपर ‘वंदे भारती’ची प्रतीक्षा अखेर संपली असून लवकरच मुंबई ते बंगळूर स्लीपर वंदे भारत धावणार आहे. ही ‘वंदे भारत’ मिरजमार्गे सुरू करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. बंगळूर येथील सर एम. विश्वेश्वरय्या टर्मिनल येथे रविवारी त्यांच्या हस्ते बंगळूर ते मुंबई व्हाया सोलापूर स्लीपर वंदे भारत हिरवा झेंडा दाखवून सुरू करण्यात आली.
याचवेळी मिरजमार्गे देखील लवकरच स्लीपर वंदे भारत धावणार असल्याचे त्यांनी घोषणा केली. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
मुंबई ते बंगळूर स्लीपर वंदे भारत मिरजमार्गे सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धनंजय महाडिक, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यामार्फत भाजपचे पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, भाजप रेल्वे प्रकोष्ट प्रदेश संयोजक सुकुमार पाटील व रेल्वे प्रकोष्ट प्रभारी कैलास वर्मा यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे वारंवार मागणी करत पाठपुरावा करण्यात आला होता.
मुंबई ते बंगळूर दरम्यान स्लीपर वंदे भारत सुरू करण्यात आली. परंतु ती सोलापूरमार्गे सोडण्यात आल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर सोलापूरमार्गे स्लीपर वंदे भारत सुरू करीत असतानाच मिरज मार्ग देखील स्लीपर वंदे भारत सुरू करत असल्याची घोषणा अश्विनी वैष्णव यांनी केल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.