

सांगली ः विधान भवनाच्या लॉबीमध्ये गुरुवारी आमदार जितेंद्र आव्हाड व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांत झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीतील पडळकर समर्थक कार्यकर्ते सांगली जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव बबन टकले (रा. माळवाडी, ता. पलूस) याच्यावर विविध पोलिस ठाण्यांत गंभीर गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, घटनेवेळी विधानभवनात आटपाडी तालुक्यातील अन्य दोन कार्यकर्तेही उपस्थित असल्याचे समजते. माळवाडी येथील ऋषिकेश हा पडळकर यांचा कट्टर समर्थक. त्याच्यावर 2013 मध्ये घातक शस्त्राने दुखापत केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर 2016 मध्ये विनयभंग, सरकारी कामात अडथळा आणण्याचे तीन गुन्हे, 2020 मध्ये अपहरणाचा, तर 2021 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याचा गंभीर गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये कारवाई केली होती. टकले हा हिंदुस्थान शिव मल्हार क्रांती सेनेचा जिल्हाध्यक्ष आहे.
दरम्यान, विधानभवनातील या घटनेवेळी आटपाडी तालुक्यातील आणखी दोन कार्यकर्ते उपस्थित होते. एकावर वाळू वाहतुकीदरम्यान कोतवालाला मारहाण केल्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधात मारहाण, सरकारी कामात अडथळा आणणे असे गुन्हे दाखल आहेत, तर दुसर्या एका कार्यकर्त्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधान भवनाच्या लॉबीत गुरुवारी घडलेल्या या हाणामारीनंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिलगिरी व्यक्त केली आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. याबाबत मी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींसमोर दिलगिरी व्यक्त करीत माफी मागतो, असे पडळकर म्हणाले.