

बागणी : वारणा नदीत शनिवारी शिगाव (ता. वाळवा) बंधार्यानजीक मोठ्या प्रमाणात मळीसद़ृश रसायन आल्याने नदीपात्रात मोठ्या संख्येने मासे मृत्युमुखी पडू लागले आहेत. आधीच बागणीसह भागात दूषित पाण्याने कावीळसद़ृश आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळू लागले आहेत. यातच नदीत मळीसद़ृश घातक रसायन सोडण्यात आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
वारणा नदीत आरोग्याला धोकादायक रसायनांचा अंश असलेले पाणी मिसळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. जलप्रदूषणावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा मात्र याकडे सोयीस्करपणाने डोळेझाक करत आहे. नदीपात्रातील पाण्यात मिसळणार्या घातक आणि जहाल रसायनामुळे शेकडो मासे मृत्युमुखी पडत आहेत. यामुळे नदीकाठावर दुर्गंधी पसरत आहे.
नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या जीवघेण्या घातक रसायनयुक्त पाण्यामुळे नदीतील दुर्मीळ मासेदेखील तडफडून मृत्युमुखी पडू लागले आहेत. या नदीत खास करुन वाम, रोहू, कटला तसेच अन्य विविध स्थानिक प्रजातीचे मासे आढळून येतात. आधीच या प्रजाती दुर्मीळ होत आहेत. यातच आता जलप्रदूषणामुळे हे मासे झपाट्याने मृत्युमुखी पडू लागले आहेत. या माशांचा अक्षरश: यातून वंशच्छेद होतोय की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. वारणा नदीच्या नशिबी अक्षरश: दैन्यावस्था आली आहे. सातत्याने या नदीत मळीसदृश रसायन सोडण्यात येते. यातून नदीचे पाणी दूषित होत आहे.