

तासगाव : पंधरा दिवसापासून बंद असलेले तासगाव शहरातील बांधकाम विभागाचे विश्रामगृह अखेर खासदार विशाल पाटील यांनी शुक्रवारी बांधकामच्या वरिष्ठ अधिकार्यांना फोन करून कानउघाडणी केल्यानंतर एका तासाच्या आत उघडण्यात आले. यानंतर ज्येष्ठ सिने आणि नाट्य अभिनेते भरत जाधव यांना विश्रामगृहामध्ये सूट उपलब्ध झाला.
एका कर्मचार्याच्या जिवावर विश्रामगृह सुरू ठेवता येणे शक्य नसल्याने बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला. याचा फटका अनेक मान्यवरांना बसत होता. दि. 18 रोजी तासगाव येथे ज्येष्ठ सिने आणि नाट्य अभिनेते भरत जाधव नाट्यप्रयोगानिमित्त तासगावमध्ये येणार असल्याने त्यांना विश्रामगृह मिळावे म्हणून आयोजकांनी प्रयत्न सुरू केले होते. पण विश्रामगृह बंद होते. नाट्यप्रेमींनी आमदार रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. आमदार पाटील यांनी, नाटकाच्या प्रयोगाच्या तारखेपूर्वी विश्रामगृह सुरू करून भरत जाधव यांच्यासाठी सूट उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.
शुक्रवारी नाटकाच्या प्रयोगासाठी भरत जाधव यांच्यासोबत असलेली वाहने तासगावला यायला निघाली तरी विश्रामगृह उघडण्यात आले नव्हते. यानंतर याची माहिती वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचे संचालक अमित पाटील यांच्या माध्यमातून खासदार विशाल पाटील यांना देण्यात आली. खासदारांनी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांना फोन करून कानउघाडणी केली. मग मात्र एका तासाच्या आत विश्रामगृह उघडले. तेव्हा कुठे नाटकाचे आयोजन करणार्यानी सुटकेचा श्वास घेतला.
शिवसेना नेते प्रदीप माने म्हणाले, तासगाव विश्रामगृह सुरू करा अन्यथा बांधकाम कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा मी दिला होता. यानंतर विश्रामगृह सुरू करण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान, अधिकार्यांचे आमदार रोहित पाटील यांच्याशी बोलणे झाल्यानंतर अधिकार्यांनी पुन्हा निर्णय बदलला. रोहित पाटील यांनी श्रेयवादासाठी विश्रामगृह सुरू करण्यास विरोध केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.