

Shaktipeeth Highway Sangli Protest
सांगली : शक्तीपीठ महामार्ग कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी रत्नागिरी-नागपूर महामार्गावर अंकली फाटा (ता. मिरज) येथे रास्ता रोको आंदोलन करत महामार्ग ठप्प केला. याप्रकरणी खासदार विशाल पाटील यांच्यासह ५० ते ६० जणांवर प्रशासनाच्या बंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शक्तीपीठ महामार्ग कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बाधित शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.३०) सकाळी मिरज तालुक्यातील अंकली फाट्यावर तीव्र आंदोलन केले. "जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची," "शेतकरी एकजुटीचा विजय असो" अशा आक्रमक घोषणा देत आंदोलकांनी महामार्ग अडवला, ज्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या आंदोलनात खासदार विशाल पाटील स्वतः सहभागी झाले होते, ज्यामुळे या आंदोलनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी २० जून रोजी जिल्ह्यात बंदी आदेश लागू केले होते. या आदेशाचा भंग करून आंदोलन करण्यात आल्याने पोलिसांनी ही कारवाई केली. सहाय्यक पोलिस फौजदार लक्ष्मण जाधव यांनी याबाबत फिर्याद दिली असून, पोलिसांनी आंदोलकांना नोटिसा बजावल्या आहेत.
'या' प्रकरणी खासदार विशाल पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सतीश साखळकर, भूषण गुरव, घनशाम नलवडे, प्रभाकर तोडकर यांच्यासह ४० ते ५० प्रमुख कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या कायदेशीर कारवाईमुळे शक्तीपीठ महामार्गाविरोधातील संघर्ष आता अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असताना, दुसरीकडे प्रशासन कायदेशीर मार्गाने आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.