

इस्लामपूर : मी कामाचा खासदार आहे, नावाचा खासदार नाही. रोज आलो आणि कामच केले नाही, तर उपयोग काय?, असे लोकसभा निवडणुकीवेळी वक्तव्य करणारे हातकणंगले मतदार संघाचे महायुतीचे खासदार धैर्यशील माने गेल्या वर्षभरापासून वाळवा- शिराळा तालुक्यात फारसे फिरकलेच नाहीत. त्यांनी ना संपर्क दौरा केला, ना आढावा बैठक घेतली. त्यामुळे खा. माने यांनी पुन्हा एकदा मागलाच कित्ता गिरवण्यास सुरुवात केली आहे काय? असा सवाल मतदारसंघातील जनतेतून उपस्थित केला जात आहे.
गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत खा. माने हे पाच वर्षांत मतदारसंघात फारसे फिरकलेच नाहीत, अशा लोकांच्या तक्रारी होत्या. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल महायुतीतच नाराजी होती. त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नये, असा सूरही लोकसभा निवडणुकीवेळी उमटत होता. तरीही खासदार माने यांनी उमेदवारी मिळवत दुसर्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत विजय मिळविला. खा. माने यांच्या विजयासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले मतदारसंघात काही दिवस तळच ठोकला होता. शिंदे यांनी लावलेल्या ‘करेक्ट’ नियोजनामुळे माने यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली. मतदारसंघाचे दुसर्यांदा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळालेले खा. माने हे आपल्या कार्यपद्धतीत बदल करतील, अशी अपेक्षा महायुतीच्या कार्यकर्त्यांसह सर्वसामान्यांना होती. मात्र तसे होताना दिसत नाही.
लोकसभा निवडणूक निकालानंतर खा. माने यांनी काही गावांचा आभार दौरा केला. मात्र त्यानंतर ते या दोन तालुक्यात फारसे दिसलेच नाहीत. वर्षभरात एकही शासकीय आढावा बैठक त्यांनी घेतलेली नाही. त्यामुळे जनतेची कामे कशी मार्गी लागणार, असा सवाल उपस्थित होत आहे. खासदारांच्याकडे काही काम असले तर येथील लोकांना कोल्हापूरला हेलपाटे घालावे लागतात. त्यामुळे खासदार माने यांनी काही महिन्यांतून तरी या तालुक्यातील जनतेला वेळ द्यावा, अशी मागणी जनतेतून होत आहे.