

संख ः लवंगा (ता. जत) येथे आडात पडून ग्रामपंचायत सदस्य माय-लेकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. विमलाबाई गोपाल कांबळे (वय 55) व मुलगा ज्ञानेश्वर गोपाल कांबळे (35) हे दोघे गुरुवारी रात्री दहा वाजता आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते.
पंढरपूर-विजापूर हा महामार्ग लवंगा गावातून जातो. लवंगा येथील सार्वजनिक आडात विमलाबाई या पाय घसरून पडल्या. त्यावेळी मुलगा ज्ञानेश्वर याने त्यांना वाचविण्यासाठी आडात उडी मारली. पण दोघेही घाबरून पाण्यात बुडाले. आरडाओरडा होताच गावातील लोकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण दोघेही मृत झाले. विमलाबाई गोपाल कांबळे यांचा मृतदेह विजापूर येथील बीएलडी, तर ज्ञानेश्वर गोपाल कांबळे यांचा मृतदेह जत येथील ग्रामीण रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता.