

सांगली/ वारणावती/शिराळा शहरः सांगलीसह परिसरात मागील तीन - चार दिवस धो-धो पडणार्या पावसाचा जोर गुरुवारी थोडा ओसरला. मात्र बहुतांशी भागात रिमझिम सुरूच राहिली. पश्चिम भागातील शिराळा आणि वाळवा तालुक्यात जोरदार पाऊस झाला. संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रासह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. आणखी दोन दिवस पावसाचा मुक्काम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी, पाऊस कधी उघडणार, याकडे शेतकर्यांचे लक्ष आहे. चार दिवसापासून पाऊस सुरू आहे. गुरुवारीही दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. दुपारी बहुतांशी भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली. वाळवा आणि शिराळा तालुक्यातील अनेक गावांत जोरदार पाऊस झाला. मिरज पश्चिम भागातही पावसाची रिपरिप सुरूच होती. संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत अडीच फुटाने वाढ झाली. या भागात पावसाचा जोर कायम असल्याने शेतात पाणी साचून राहिले आहे. काही शेतातून पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकर्यांचा प्रयत्न सुरू होता. या पावसामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसल्याचे चित्र आहे.
खानापूर, तासगाव, जत तालुक्यांतील अनेक गावांमध्येही पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली, त्यामुळे शेतकरी पुन्हा कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले. सांगली शहर व परिसरात अधुन-मधून रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या. दिवसभर पावसाने उघडीप दिली होती.
चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात येथे गेल्या 24 तासात 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मे महिन्यातच वाढ झाली आहे. चांदोली परिसरात गेल्या आठवड्यात अधुन-मधून वळीव पावसाने हजेरी लावली होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे. ओढे, नालेही वाहू लागले आहेत. धरणाच्या पाणी पातळीतही किंचित वाढ झाली आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खरीप पेरणीची कामे खोळंबली आहेत. अधुन-मधून वीजपुरवठा खंडित होत आहे. बुधवारी विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. गुरुवारी दिवसभरात मात्र संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे पूर्णपणे मान्सून पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. चांदोली धरणात सध्या 13.47 टीएमसी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी 39.16 आहे. पायथा वीजगृह तसेच कालव्यातून 1070 क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. उपयुक्त पाणीसाठा 6.59 टीएमसी आहे. गतवर्षीच्या तुलनेत जवळपास एक टीएमसी अधिक पाणीसाठा आहे.