

कडेगाव शहर : महाराष्ट्र कर्जाच्या दलदलीत अडकला आहे. दहा लाख कोटींचे कर्ज करूनही विकास दिसत नाही. राज्य भिकेला लागले आहे. राज्य कंगाल झाले असून कर्जाच्या खाईत गेले आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. त्यांनी महायुती सरकारवर घणाघाती हल्ला चढवला. मराठा आरक्षणाच्या विषयावर काढलेल्या जीआरचा अर्थच कळत नाही, असेही ते म्हणाले.
वांगी (ता. कडेगाव) येथील लोकतीर्थ स्मारकाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, माजी आमदार विक्रम सावंत, डॉ. शांताराम कदम, महेंद्र लाड, डॉ. जितेश कदम आदी उपस्थित होते. यावेळी वडेट्टीवार म्हणाले, शेतकरी अडचणीत आहे, तरुणांना रोजगार नाही; पण अब्जावधींच्या जमिनी गुजरातच्या उद्योगपतींना वाटल्या जात आहेत. ही स्थिती थांबवायची असेल, तर महाराष्ट्राच्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र यावे लागेल.
मतांची चोरी करून भाजप सत्तेत आला आहे असे सांगून ते म्हणाले, देशातील संविधानिक मूल्ये धोक्यात आली आहेत. जाती-धर्माच्या राजकारणामुळे देशाचे प्रचंड नुकसान होत आहे, पण महाराष्ट्राची ताकद ही विविधतेतील एकतेत आहे आणि ती जपणे हेच कर्तव्य आहे. यावेळी नगरसेवक रामचंद्र कदम, युवा नेते दिग्विजय कदम, हर्षवर्धन कदम, ज्येेष्ठ नेते जे. के. बापू जाधव, डॉ. विजय होनमाने, उत्तमराव पवार आदी उपस्थित होते.
करमाळ्यातील महिला पोलिस अधिकार्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या दमदाटीवरून विजय वडेट्टीवार यांनी टीका केली. ते म्हणाले, चोरीचे आणि चुकीचे काम कोणी केले असेल, तर त्याच्यावर कारवाई करणे पोलिस अधिकार्यांचे काम आहे. सत्ता सेवेसाठी आहे. सत्ता दुसर्यांवर दादागिरी करण्यासाठी नाही. त्या अधिकार्यावर दादागिरी करणे हे लोकशाहीला शोभत नाही. मन वाट्टेल तसे आम्ही काम करू, अशी भूमिका त्यांची दिसते. प्रत्येकाला सत्तेचा माज आलाय. यांच्यामध्ये तो ओसंडून वाहत आहे. सत्ता सेवेसाठी होती, पण आता महायुतीच्या सरकारला सत्ता मालकी हक्काने मिळाल्यासारखे वाटते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फार चतुर आहेत. ते फार चाणाक्ष आहेत. आरक्षणाच्या प्रश्नावर समाजात फूट पाडून महाराष्ट्राचे भविष्य धोक्यात घातले जात आहे. मुख्यमंत्र्यांनी दोन्ही समाजाला खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केले. राज्य शासनाने काढलेल्या जीआरचा अर्थच कळत नाही आणि ओबीसींना काय दिले हेच समजत नाही. एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसर्याने रडल्यासारखे करायचे. एकाने हसल्यासारखे करायचे आणि दुसर्याने अश्रू पुसल्यासारखे करायचे, अशा पद्धतीचे स्क्रिप्टेड काम सध्या राज्यात सुरू आहे. भविष्यात सगळ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसून येईल. महायुतीचे सरकार हे बाबळीच्या झाडाला दगड मारते आणि आंबे पडले म्हणून ओरडते. त्यांच्याजवळ गेले की मात्र, काटे रुततात. जे जे जवळ गेले त्यांना ते कळेल.
विखे-पाटील यासाठीच म्हणतात की, उद्या काही बिघडलं, तर माझ्यावर येऊ नये, त्यांची बला त्यांच्यावरच जावी आणि मी मोकळा व्हावा, अशी त्यांची भूमिका असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.