

शिराळा शहर : येथील जगप्रसिद्ध नागपंचमीबाबत केंद्र सरकारकडे सकारात्मक भूमिका मांडून शिराळकरांच्या भावनेचा आदर राखत त्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. शिराळा नागपंचमीस जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारने भूमिका मांडावी, अशी मागणी आमदार सत्यजित देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीद्वारे केली. या लक्षवेधी प्रश्नावर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक बोलत होते.
सत्यजित देशमुख म्हणाले, नागपंचमी हा सण परंपरागत अनेक वर्षांपासून साजरा केला जात होता. सन 2002 ला एक सहनियंत्रण समिती नेमली गेली आणि त्यानंतर जिवंत नागाची पूजा करण्यावर बंदी आली. त्यानंतर मातीचा नाग किंवा नागाची प्रतिमा पूजन करून शिराळकर ही नागपंचमी साजरी करतात. सन 2014 साली मोदी सरकार आल्यानंतर हिंदू धार्मिक रूढी, परंपरा जपणारे सण घटनेचे अधिकार अबाधित ठेवून साजरे करण्यात येतात. याकरिता सुब्रमण्यम समिती नेमली गेली. या समितीने बैलगाडी शर्यत व तमिळनाडू राज्यातील जल्ली कटीवरील निर्बंध उठवले. सन 2022 ला वन्यजीव संरक्षण कायद्यामध्ये सुधारणा झाली. त्यामध्ये हत्तीच्या वापर समारंभांना करण्याबाबत परवानगी मिळाली. नागपंचमीस जिवंत नागाची पूजा करता यावी, अशी शिराळकरांची भावना आहे. महाराष्ट्राच्या गॅझेटमध्ये त्याची नोंद आहे. लोकांच्या भावनेचा आदर करून सांस्कृतिक व धार्मिक कारणाने अंतर्भूत करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्र सरकारकडे यशस्वी मांडणी करून जिवंत नागाची पूजा करून नागपंचमी साजरी करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी सभागृहात आमदार देशमुख यांनी केली. यावर उत्तर देताना वनमंत्री नाईक म्हणाले, राज्य सरकार केंद्र सरकारकडे नागपंचमीबाबत सकारात्मक भूमिका मांडेल. केंद्रीय मंत्र्यांना ही बाब पटवून देऊन केंद्र सरकार न्यायालयामध्ये आपले म्हणणे सकारात्मक मांडेल व शिराळकरांच्या भावनेचा आदर करत शिराळकरांची इच्छा पूर्ण होईल, अशी भूमिका घेऊ.
शिराळकरांच्या जिव्हाळ्याच्या असणार्या नागपंचमीबाबत येत्या 7 आणि 8 जुलैरोजी दिल्ली येथे केंद्रीय वनमंत्री भूपेंद्रसिंह यादव यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. त्यासाठी वनमंत्री गणेश नाईक, आमदार सत्यजित देशमुख आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.