आतापर्यंत भाजप घेऊन तुम्ही इकडे-तिकडे पळवायचा, ते आता चालणार नाही : आमदार पडळकर यांचा वैभव पाटलांना टोला

Sangali Politics
Sangali PoliticsPudhari Photo
Published on
Updated on

विटा : विटा पालिका भाजपच्या चिन्हावरच लढवणार आणि जिंकणार. आतापर्यंत भाजप घेऊन तुम्ही इकडे तिकडे पळवायचा, पण ते आता चालणार नाही, असा टोला नव्याने भाजपात प्रवेश केलेल्या माजी आमदार पाटील गटाचे नेते वैभव पाटील यांना लगावला. तसेच आगामी जि.प.पं. स. नगर पंचायत आणि नगरपालिका निवडणुका भाजप सिंगल (एकट्याने) लढवणार, असा निर्धार आमदार पडळकर यांनी व्यक्त केला.

विधानसभेनंतर काहीजण अजूनही हवेतच

विट्यात भाजपचा पदाधिकारी संवाद मेळावा झाला. या मेळाव्यात आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, किशोर डोंबे, मयुरेश गुळवणी आदींची भाषणे झाली. यात आमदार पडळकर म्हणाले, विधानसभेनंतर काहीजण अजूनही हवेत आहेत. आमचं फार चांगलं आहे, असं म्हणताहेत. पण लोकं कोणाला बांधील नसतात.

नेत्यांनी सामान्य लोकांसाठी काम केले पाहिजे

खानापूर तालुक्यात लोकं गुलामगिरीच्या जोखडात आहेत. त्यांना मुक्त करायचं आहे. या तालुक्यात पंचायत समितीत १८-२० वर्षे झाले तेच अधिकारी तळ ठोकून आहेत. ते नेत्यांची कामे करतात लोकांची नाही. अशांना वठणीवर आणलं पाहिजे. सामान्य लोकांसाठी काम करा. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका नगरपंचायत यांच्या निवडणुका भाजपा सिंगल (एकटे) लढवणार आहे.

विटा नगरपालिकेवर  भाजपचाच झेंडा

आटपाडी नगरपंचायत यंदा भाजपच जिंकणार, यावेळी विटा नगरपालिकेवरही भाजपचाच झेंडा फडकेल. हे केवळ मी भाषणात बोलत नाही. तर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या चिन्हावर आपल्याला जिंकायचे आहे. ते पुढे म्हणाले की, इथले काही लोक सोडून गेले. त्यावर गोपीचंद पडळकरला धक्का ! असे माध्यमातून आले मात्र असले अनेक धक्के सहन करतच आपण पुढं आलोय, असेही ते म्हणाले.

जत मतदारसंघांमध्ये चार हजार शेततळी

यानंतर आ. पडळकर म्हणाले की, "मंत्री नितेश राणे यांनी तलावात, धरणात अगर समुद्राच्या पाण्यातल्या मत्स्य व्यवसायाला शेतीचा दर्जा दिला आहे. जे शेतकऱ्याला मिळणार ते मत्स्यव्यवसायिकाला मिळणार. आम्ही त्यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे की, शेततळ्यांमध्येही मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांनाही तो लाभ मिळावा. जत मतदारसंघांमध्ये चार हजार शेततळी आहेत. याबाबतचा चाचणी प्रकल्प (पायलट प्रोजेक्ट) राज्य सरकारने जत तालुक्यात सुरू करावा अशी आपण मागणी केली आहे, याबाबत उद्या म्हणजे सोमवारीच बैठक आहे".

दुष्काळी भागात बोटिंगच्या स्पर्धा घेणार ? 

जत सारख्या दुष्काळी भागात आम्ही बोटिंगच्या स्पर्धा घेतोय, शक्य होतं का? कधी ऐकलं होतं का? पण आता ते घडतंय. अख्ख्या महाराष्ट्रातील पोरं तिथं बोटी घेऊन जतमध्ये येत आहेत. त्यानंतर खानापूर मतदारसंघातही देशातली बोटिंगची स्पर्धा राजेवाडी तलावात घ्यायची आहे. दुष्काळी, दुष्काळी म्हणून राहणं आता बास झालं. ते म्हणाले,

शेतजमीनी सौरऊर्जेची शेती

ते पुढे म्हणाले, राज्यातील दुष्काळी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी जिथे पाणी येऊन सुद्धा शेती करता येत नाही, अशा खडकाळ जमीनींत काही पिकत नाही अशा शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, म्हणून आपण मुख्यमंत्र्यांकडे एक योजना मांडली आहे. एकरी ५० हजार रुपयेचा भाडेपट्टा शेतकऱ्यांना द्यावा. अशा खडकाळ जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प बसवू, त्यातून या सगळ्या भागात सौरऊर्जेची शेती होईल, शेतकऱ्यांना घरबसल्या पैसे मिळतील. अशी एक हजार एकर जमीन आपण शासनाला देऊ, असं ही पडळकर म्हणाले.

श्रेय कुणीही घ्या, काम झालं पाहिजे

खानापूरात शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्याबाबत ते म्हणाले, आपण कुलगुरूंशी बोललो आहे, सध्या जी जलसंपदा विभागाची इमारत आहे ती भाड्याने घेऊन त्यात तात्काळ उपकेंद्राचे कामकाज सुरू करा. त्याबरोबरच प्रस्तावित जागेत नवीन इमारतींचा प्रस्ताव सादर करा, मी लगेच मंजूर करून घेतो. श्रेय कुणीही घ्या, काम झालं पाहिजे.

चांगली पेरणी करा, पीक नक्कीच चांगले उगवणार

२०२९ची निवडणूक अजून लांब आहे. तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालून जाणार आहे, काही जण आख्खे वाहून जातील. तो विषय नंतरचा आहे. परंतु, आत्ता जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजपला एकट्याला निवडणूक लढवायची आहे. आपल्याला सगळीकडे उमेदवार चांगले आहेत. खानापूर तालुक्यात भाजपला एकदम भुस भुशीत रान झाले आहे. तुम्ही चांगली पेरणी करून घ्या, चांगले पीक नक्की उगवणार. जुन्या आणि नव्या लोकांनी एकत्र येऊन काम करा असे आवाहनही आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news