

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : मागच्या दारातून नाही तर आता थेट पुढच्या दारातून विधानसभेत प्रवेश केला आहे. १७ वर्षेच्या संघर्षाचे जतच्या जनतेने विजयात रूपांतर केले आहे. आता जत व खानापूरमध्ये शेती, पाणी आणि उद्योग या त्रिसूत्रीवर मी काम करून जनतेच्या ऋणाईतून मुक्त होण्याचा प्रयत्न करेन, अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली.
आटपाडी येथे नागरिकांच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर, हरिदास गायकवाड, विनायक पाटील, चंद्रकांत दौडे, विष्णू अर्जुन, यु. टी. जाधव, रणजित ऐवळे, संजय तेली, माजी जि. प. सदस्य सरदार पाटील यांच्यासह जतमधील सर्व नगरसेवक उपस्थित होते.
पडळकर म्हणाले की, जतला तिकीट देताना आणि मिळाल्यावर देखील अडचणी निर्माण करायचा प्रयत्न झाला. आता संघर्ष संपला आहे. सर्वसामान्य माणसाला आता विविध पदावर बसवायचे आहे. जतच्या जनतेने माझ्यावर विश्वास टाकला. त्यांच्या मातीचा सन्मान वाढवण्यासाठी काम करणार आहे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून मी नाराज नाही. कार्यकर्त्यांनीही नाराज होऊ नये. मंत्रिपदापेक्षा आपला नेता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत. यातच सगळे आले. दोन्ही मतदारसंघात विकासासाठी मी सदैव कार्यरत राहीन.
डॉ. नागनाथ आण्णा नायकवडी यांच्या चळवळीने टेंभूचे पाणी आले. त्यामुळे त्यांचे नाव टेंभू योजनेला देण्यासाठी आणि त्यांचे स्मारक उभरण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही पडाळकर यांनी दिली.
ब्रम्हानंद पडळकर म्हणाले की, गोपीचंद जतचे आमदार झाले असले, तरी त्यांचा आत्मा आटपाडी आहे. दोन्ही मतदारसंघांना ते निश्चितपणे न्याय देतील. आगामी सर्व निवडणुकीत भाजपचे काम ताकदीने करू.
आटपाडी बसस्थानकापासून बचतधाम मैदानापर्यंत आमदार पडळकर यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. ढोल, ताशा, हत्ती, उंट, घोडे आणि त्यावर छत्रपती शिवाजी महाराज व विविध मान्यवरांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी सहभागी झाले होते. शहरात ठिकठिकाणी पडळकर यांचे नागरिकांनी स्वागत केले. हेलिकॉप्टर आणि 51 जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी सरपंच हिराबाई पडळकर आदी उपस्थित होते.