अतिक्रमण, अनधिकृत बांधकामांवर मिशन मोडवर कारवाई

नवे आयुक्त सत्यम गांधी : रस्ते, पाणी, शिक्षण, स्वच्छता हे प्राधान्याचे विषय
illegal construction crackdown
सांगली महानगरपालिका pudhari photo
Published on
Updated on

सांगली : महापालिका क्षेत्रातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांविरोधात दहा दिवसांत ‘मिशन मोड’वर कारवाई सुरू करण्यात येईल. रस्ते, पाणी, शिक्षण आणि स्वच्छता, हे माझ्या कामकाजाचे प्राधान्याचे विषय आहेत. नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीचे निवारण झाले पाहिजे, यावर माझा कटाक्ष राहणार आहे, असे नूतन आयुक्त सत्यम गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

ते म्हणाले, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम झालेली ठिकाणे दहा दिवसांत निश्चित केली जातील. महापालिकेच्या मालमत्ता विकसित करून त्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळवून देण्यावर फोकस राहील. महापालिका क्षेत्रातील हरितक्षेत्र वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. उद्यान, बागा विकसित व अधिक सुंदर बनवल्या जातील. महापालिका क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा, महापालिका शाळातील शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे आणि कचरा उठावाद्वारे शहर स्वच्छ, सुंदर करणे हे प्राधान्याचे विषय आहेत. त्यामध्ये हलगर्जीपणा होऊ देणार नाही.

नागरिकांच्या तक्रारींचे शंभर टक्के निवारण करण्यात येईल. एखादी तक्रार घेऊन नागरिक दुसर्‍यांदा महापालिकेत येणार नाही, याची दक्षता घेण्याबाबत स्पष्ट सूचना खातेप्रमुखांना दिल्या आहेत. मालमत्ता कराची जास्तीत जास्त वसुली करण्यावर भर राहील. महापालिका आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न केले जातील. संभाव्य पूरस्थिती आणि उपाययोजना याबाबत आढावा घेऊन चांगले नियोजन करण्यात येणार आहे. पूर नियंत्रणांतर्गत जागतिक बँक अर्थसहाय्यित प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर झालेला नाही. अचानकपणे कमी वेळेत जादा पाऊस झाल्यास निर्माण होणार्‍या समस्येपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी नियोजन व उपाययोजना केल्या जाणार आहेत, असेही गांधी यांनी सांगितले.

सांगली, मिरज ड्रेनेज योजना पूर्ण होण्यास झालेल्या विलंबाची माहिती घेतली जाईल. नाल्यांवरील अतिक्रमणांबरोबरच शहरातील सर्व अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीम राबविली जाईल. प्रधानमंत्री ई-बस सेवा लवकर सुरू करण्यासंदर्भात नियोजन व कार्यवाही केली जाईल, असेही गांधी यांनी सांगितले.

माझे कामच बोलेल

नूतन आयुक्त सत्यम गांधी म्हणाले, महापालिकेचा कारभार ‘सिटीझन फ्रेंडली’ होईल. नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यावर भर राहील. कारभारात शिस्त, पारदर्शीपणा आणि गतिमानता आणली जाईल. माझे कामच बोलेल.

आयुक्त म्हणाले..!

  • एका वर्षात महापालिका शाळांची गुणवत्ता वाढवणार

  • महापालिका क्षेत्रात हरितक्षेत्र कमी आहे, ते वाढवणार.

  • शहर स्वच्छतेवर भर; घनकचरा दिसल्यास कारवाई.

  • मालमत्ता कर वसुलीवर स्पेशल फोकस.

  • अग्निशमन दल अधिक सक्षम, गतिमान केले जाईल.

  • जन्म-मृत्यू, विवाह नोंदणीसह अन्य दाखले मुदतीत मिळतील.

  • रस्ते कामांच्या गुणवत्तेत हयगय चालणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news