

कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथे ग्रामदैवत हनुमान यात्रेनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात इराणच्या मिर्झा इराणीने हनुमान केसरीचा किताब पटकावला. एक तासाहून अधिक काळ चाललेल्या अटीतटीच्या लढतीत मिर्झा इराणीने भारताच्या भूपेंदर अजनालाचा गुणांवर पराभव केला.
भारत विरुद्ध इराण अशा या रंगतदार कुस्ती स्पर्धेत इराणी पैलवानांनी वर्चस्व गाजवले. द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीतही इराणच्या हदी इराणने भारताच्या बिपीनचा पराभव केला. या स्पर्धेत श्रीमंत भोसले याने सचिनला, तर धीरज पवारने अमित कुमारला चितपट केले. याशिवाय बाळू अपराध, अमोल मुंडे, अमर पाटील, ओमकार मदने, मनोज कदम, संकेत पाटील, दिग्विजय जाधव, विघ्नेश केसरकर, इर्शाद पठाण, विश्वजित पाटील, शुभम पाटील, अथर्व भोसले, अनिकेत चोपडे, केदार पाटील, रितेश गावडे, प्रथमेश पाटील आणि शंकर पाटील यांनी चटकदार कुस्त्या करून प्रेक्षकांची मने जिंकली.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. मैदानाचे नियोजन यात्रा समितीचे अध्यक्ष अशोक पाटील, वारणा दूध संघाचे संचालक व्ही. टी. पाटील, उपाध्यक्ष मारुती जाधव आणि सदस्यांनी केले. यावेळी सपोनि विक्रम पाटील यांच्यासह मान्यवरांनी मैदानाला भेट दिली. कुस्तीचे निवेदन ईश्वरा पाटील व प्रकाश रसाळ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सचिन पाटील, रवींद्र जाधव, बाबासाहेब पाटील, उत्तम वायदंडे, सचिव नितीन पाटील, ब्रह्मेंद्र दिंडे, एकनाथ देवकर व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.