Miraj Crime: तरुणावर खुनी हल्ला

मिरजेत टोळी युद्धाचा पुन्हा भडका; गुंडांचे कृत्य
crime
crimePudhari
Published on
Updated on

मिरज : मिरजेत टोळी युद्धाचा पुन्हा भडका उडाला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी राज्यमार्गावर थरारक पाठलाग करून एकावर खुनी हल्ला करण्यात आला. शिव ऊर्फ प्रदीप सदाशिव अथणीकर असे जखमीचे नाव आहे. त्याच्या डोक्यात तलवारीने तब्बल १३ वार केले असून त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

जखमी शिव अथणीकर व हल्लेखोरांच्या टोळीमध्ये दोन वर्षांपूर्वी मिरजेतील रस्सा हॉटेलमध्ये तुफान हाणामारी झाली होता. यावेळी शिव अथणीकर याच्या टोळीने नामचीन गुंडांच्या टोळीवर हल्ला केला होता. यावेळी संबंधित नामचीन गुंडाने हॉटेलमधून पलायन केल्याने तो बचावला होता. संबंधित हल्लेखोरांची टोळी मंगळवारी दुपारी तासगाव फाट्यावरील एका बारमध्ये दारू पिण्यास बसली होती. यावेळी शिव अथणीकर हा या टोळीस दिसला. त्यांनी त्याचा महामार्गावर पाठलाग सुरू केला. मिरज - सलगरे राज्यमार्गावरील बागवान मळ्यापर्यंत त्याचा पाठलाग केला.

बागवान मळ्याजवळ शिव याच्या दुचाकीला त्यांनी मोटारीने मागून जोरदार धडक दिली. धडकेने तो दुचाकीवरून खाली पडला. यानंतर चौघांच्या टोळीने त्याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढविला. त्याच्या डोक्यामध्ये तलवारीने वार करण्यात आले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर टोळीने घटनास्थळावरून पलायन केले.

पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा, मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण चौगले, मिरज शहर गुन्हे प्रकटीकरणचे सहायक निरीक्षक भैरवनाथ पाटील यांच्यासह पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. मिरज शहर व सांगली गुन्हे अन्वेषणची पथके संबंधित टोळीच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news