

सांगली : सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यात डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे सांगली पोलिसांनी आवाहन केले होते. परंतु त्याला काही मोजकी मंडळे वगळता सर्वांनी बगल दिली. विशेष म्हणजे मिरजेतील भोई समाजाच्या गणेश विसर्जनासाठी आणलेल्या डीजेसमोर पोलिसच थिरकल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.
डीजे हा सर्वांनाच धोकादायक व अपायकारक असणारा आहे. त्यामुळे त्याला बगल देऊन डीजेमुक्त आणि नशामुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे सांगली, मिरज पोलिसांनी टाहो फोडून सांगितले. बैठकावर बैठका पार पडल्या. प्रत्येक मंडळाच्या अध्यक्षांना पारंपरिक वाद्यांसह गणेश विसर्जन मिरवणूक काढावी, असे पोलिसांनी आवाहन केले. काही मंडळांनी त्याला प्रतिसाद देत पारंपरिक वाद्यांच्या निनादात विसर्जन मिरवणूक काढली.
मिरजेत सर्वात शेवटी मिरज शहर पोलिसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. पोलिसांनीच आवाहन केल्याने पोलिसांनी देखील विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल-ताशा पथक आणले. ढोल-ताशा पथकांच्या निनादात मिरज शहर पोलिसांच्या गणेशाचे विसर्जन करण्यात आले. परंतु यावर्षी भोई समाज मंडळाची गणेशमूर्ती मात्र विसर्जनासाठी मागे ठेवण्यात आली होती. प्रत्येक वर्षी ती भोई समाज त्यांच्या सोयीनुसार विसर्जन करीत असतात. परंतु यावर्षी मात्र भोई समाजाच्या मंडळाची मूर्ती पोलिसांच्या गणेशाच्या पुढे मार्गस्थ झाली.
पोलिसांनी पारंपरिक वाद्य आणले असले तरी भोई समाजाने मात्र डीजे आणला होता. डीजेचा दणदणाट करत पोलिसांच्या गणपतीच्या पुढे भोई समाजाची मिरवणूक निघाली. परंतु डीजेमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन करणारे सर्व पोलिस भोई समाज मंडळाच्या डीजेसमोर थिरकताना दिसले. त्यामुळे मिरजेतील गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या भुवया मात्र उंचावल्या होत्या.