

सांगली : विनापरवाना देशी बनावटीची दोन पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि एक मोटार, असा एकूण ९ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. दर्शन अनिल कांबळे (वय २६, रा. ईदगाहनगर झोपडपट्टी, मिरज) आणि शेखर महावीर लोंढे (२९, रा. माजी सैनिक वसाहत, सह्याद्रीनगर, मिरज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, त्यांना ही पिस्तूलं पुरवणारा आकाश ढिगे (रा. कोपल, जि. गदग, कर्नाटक) हा संशयित फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस पथक अवैध शस्त्रांविरोधात विशेष मोहीम राबवत होते. यावेळी भारतनगर येथील ख्रिश्चन दफनभूमीजवळ एका काळ्या रंगाच्या मोटारीत दोन व्यक्ती कमरेला पिस्तूल लावून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे उपनिरीक्षक महादेव पोवार यांच्या पथकाने संबंधित मोटारीस (क्र. एमएच १० इआर १००९) घेरून दोन्ही संशयितांना पंचासमक्ष ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे २ देशी बनावटीची पिस्तूलं आणि २ जिवंत काडतुसे मिळून आली. परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले.
ही शस्त्रे कर्नाटकातील आकाश ढिगे याच्याकडून खरेदी केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. पोलिसांनी १ लाख रुपये किमतीची २ पिस्तूल, १ हजार रुपयांची काडतुसे आणि ८ लाखांची मोटार, असा एकूण ९ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल रोहन घस्ते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.