मिरज : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शनिवारी मिरज तालुक्यात सरासरी 66 ते 67 टक्के मतदान झाले. वादावादीचे किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत झाले. 2017 च्या निवडणुकीमध्ये मिरज तालुक्यात 68.71 टक्के मतदान झाले होते.
जिल्हा परिषदेच्या गटांसाठी मिरज तालुक्यातील भोसे, एरंडोली, आरग, बेडग, मालगाव, कवलापूर, बुधगाव, कसबे डिग्रज, कवठेपिरान, समडोळी व म्हैसाळ या 11 गटांसाठी मतदान झाले. मिरज पंचायत समितीसाठी सोनी, भोसे, एरंडोली, सलगरे, खटाव, आरग, नरवाड, बेडग, गुंडेवाडी, मालगाव, बामणोली, कवलापूर, माधवनगर, बुधगाव, नांद्रे, कसबे डिग्रज, दुधगाव, कवठेपिरान, समडोळी, इनाम धामणी, टाकळी, म्हैसाळ या 22 गणांसाठी मतदान झाले. मिरज तालुक्यातील 3 लाख 2 हजार 694 मतदारांची नोंद होती. यामध्ये एक लाख 52 हजार 426 पुरुष, तर 1 लाख 50 हजार 200 9 स्त्री मतदारांचा समावेश होता. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. जिल्हा परिषदेसाठी उभ्या असलेल्या 37, तर मिरज पंचायत समितीसाठी उभ्या असलेल्या 57 अशा एकूण 94 उमेदवारांचे राजकीय भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये कैद झाले. उद्या, सोमवारी (दि. 9 फेब्रुवारी) मिरजेच्या शासकीय नवीन धान्य गोदामामध्ये (वैरण बाजार) मतमोजणी होणार आहे.
तालुक्यात 326 मतदान केंद्रांवर काल मतदान झाले. सकाळपासूनच काही मतदान केंद्रांवर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर सकाळी तुरळक गर्दी होती. साडेअकरापर्यंत तालुक्यात 56 हजार 22 जणांनी (18.51 टक्के) मतदान केले. दुपारी दीड वाजेपर्यंत 99 हजार 162 जणांचे (32.76 टक्के) मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत 1 लाख 42 हजार 222 जणांनी (46.95 टक्के) मतदान केले.
भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही शिवसेना, जनसुराज्य शक्ती पक्ष या पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांना मतदान करवून घेण्यासाठी चुरशीने प्रयत्न केले. मतदान केंद्रापर्यंत मतदारांना ने - आण करण्यासाठी वाहनांचा वापर झाला. मतदारांना मतदान करण्यासाठी नेताना काही ठिकाणी वाद झाले. हरिपूर व बेडग येथे ईव्हीएम मशीन बंद पडले. त्यानंतर काही वेळातच निवडणूक यंत्रणेने हे मशीन सुरू केले. नरवाड येथे मतदान केंद्रावर कंट्रोल युनिट काही वेळ बंद पडले होते.