

मिरज : सुभाषनगर (ता. मिरज) येथे दोन गटात झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी 22 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रावसाहेब लोखंडे याने मोहसीन बाबू फनिबंद, मेहबूब सेफन शेख, ख्वाजा पीरसाहेब शेख, बंदेनवाज पीरसाहेब शेख यांच्यासह आठ जणांविरुद्ध, तर मोहसीन बाबू फनिबंद याने रावसाहेब लोखंडे, अजित चौगुले, सुनील कोडलकर, अनिल लोखंडे, वरुण खोत, रावसाहेब कांबळे, गुंड्या कुल्लाळ, रूपेश लोखंडे, जितेंद्र लोखंडे, राजू भंडारे, प्रतीक भंडारे, राहुल कुल्लाळ आणि सुनीता लोखंडे अशा चौदाजणांवर मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
रावसाहेब लोखंडे हा दि. 14 रोजी रात्री त्याच्या घरासमोर फोनवर बोलत बसला होता. त्यावेळी मोहसीन फनिबंद त्या ठिकाणावरून निघाला होता. फोनवर बोलत असताना रावसाहेब लोखंडे याने त्याच्या मित्राला जनावरांचा कडबा आणण्यासाठी ‘तू त्या रस्त्यावरून जा’ असे म्हणाला होता. परंतु हे आपल्यालाच उद्देशून म्हणाल्याचा समज मोहसीन याचा झाला. त्यावेळी त्यांच्यात वादावादीचा प्रकार घडला. त्यानंतर मोहसीन याने जमाव घेऊन येऊन रावसाहेब याच्या घरावर हल्ला चढविला.
रावसाहेब याच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच तलवार आणि कोयत्याने हल्ला करून सहा जणांना जखमी करण्यात आले. तसेच चार ते पाच वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. या घटनेमुळे सुभाषनगर परिसरात रात्रभर मोठा तणावर निर्माण झाला होता.
भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या होमगार्डवरही हल्ला
दोन गटात हाणामारीचा प्रकार सुरू झाल्यानंतर त्याच परिसरात राहणाऱ्या एका होमगार्डने मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच्यावरही हत्याराने हल्ला करण्यात आला. त्यावेळी धारदार हत्याराचा वार हनुवटीवर बसल्याने यामध्ये होमगार्डही जखमी झाला आहे.