

जालिंदर हुलवान
मिरज : सिग्नल नसणारे राज्यातील एकमेव शहर ही मिरजेची झालेली ओळख सध्या तरी पुसली गेली. तब्बल तीस वर्षांनंतर सहा चौकांमध्ये वाहतुकीचे सिग्नल सुरू झाले. सुमारे एक कोटी रुपये खर्च करून हे सिग्नल सुरू झाल्याने वाहतूक नियंत्रणास मदत होणार आहे.
मिरजेत तत्कालीन नगरपालिका अस्तित्वात असताना वाहतूक सिग्नल बसवले होते. त्यावेळी वाहनांची संख्या तुलनेत कमी असली तरी वाहतूक नियंत्रणाचे काम चांगल्या पद्धतीने केले जात होते. त्यानंतर या वाहतूक सिग्नलकडे पूर्ण दुर्लक्ष झाले. सर्व चौकांतील सिग्नल एक-एक करत बंद पडले. त्याचे नंतर भंगार झाले. याबाबत ‘पुढारी’ने सातत्याने आवाज उठविला होता. त्याची दखल घेऊन माजी मंत्री व आमदार सुरेश खाडे यांनी सिग्नल बसवण्यासाठी पुढाकार घेतला. जिल्हा नियोजन मंडळातून आमदार खाडे यांच्या प्रयत्नातून शहरातील पाच ठिकाणी सिग्नल बसवण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातून काउंटडाऊन प्रकारचे सिग्नल बसवले.
महात्मा गांधी चौक हा मिरजेतील सर्वात मोठा चौक. येथेही यापूर्वी अनेकवेळा सिग्नल बसवले होते. मात्र देखभालीअभावी ते सुरूच झाले नाहीत. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक सिग्नल बसवण्यासाठी झालेला खर्च हा वाया गेला. या सिग्नलचा वापर अनेकजण टपरीचे पत्रे बांधण्यासाठी आणि डिजिटल बोर्ड लावण्यासाठी करीत होते. या चौकात स्मार्ट सिग्नल बसवण्यात यावे यासाठी महानगरपालिकेने तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम या योजनेमधून या गांधी चौकातील सिग्नलसाठी सुमारे 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हे सिग्नल बसवण्यासाठी पुण्यातील एका कंपनीला ठेका देण्यात आला. त्याचे काम पूर्ण झाल्याने येथेदेखील हे सिग्नल सुरू झाले आहेत. या चौकातून येणार्या सर्व रस्त्यांवर प्रत्येकी एका रस्त्यावर दोन अत्याधुनिक असे सीसीटीव्ही बसवले आहेत. येथील सीसीटीव्हीचा डीव्हीआर व टीव्ही कनेक्शन हे महापालिकेमध्ये कार्यान्वित आहे.
ऑटोमॅटिक नंबर प्लेट डिटेक्टरमुळे व स्मार्ट सिग्नल, स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेर्यामुळे वाहनांचे नंबर प्लेट आपोआप दिसतील. रस्त्यांवर असणारी वाहतूक संख्या बघून सिग्नल आपोआप चालू किंवा बंद होणार आहेत. संबंधित कंपनीला या सिग्नलची सुमारे तीन वर्षे मोफत देखभाल करावी लागणार आहे. तसा करार या कंपनीशी केला आहे. वंटमुरे कॉर्नर, छत्रपती शाहू महाराज चौक, स्टेशन रोड चौक, गाढवे चौक, शास्त्री चौक या पाच चौकांमधील सिग्नलदेखील सुरू झाले आहेत. याचा लोकार्पण सोहळा आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
मिरजेतील छत्रपती शाहू महाराज चौक, रेल्वे स्टेशन चौक, वंटमुरे कॉर्नर, गाढवे चौक, शास्त्री चौक या पाच चौकांमध्येदेखील वाहतूक सिग्नल उभारले आहेत. या सिग्नलसाठी स्वतंत्र वीजपुरवठा लागतो. त्यासाठीही महापालिकेने वीज जोडणी घेतली आहे.
मिरजेतील वाहतूक अनेकवेळा बेशिस्त असते. बहुसंख्य वाहनचालकांना वाहतूक सिग्नलची सवय नसल्याने गोंधळ उडतो. मात्र आता वाहतूक सिग्नल सुरू झाल्याने वाहतूक पोलिसांवरच वाहतुकीचा बेशिस्तपणा मोडण्याची जबाबदारी आली आहे.