Miraj News| मिरजेच्या स्वच्छता ठेक्यावरून शहरांच्या अस्मितेचा संघर्ष

विकासातील असमतोल, राजकीय वर्चस्व, निधी वाटपाचा मुद्दा ऐरणीवर
Sangli Municipal Corporation
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकाPudhari
Published on: 
Updated on: 

सांगली : महापालिकेच्या महासभेत मिरज शहरातील स्वच्छता आणि कचरा संकलनाच्या २३ कोटी ९५ लाख रुपयांच्या ठेक्यावरून झालेला गदारोळ हा केवळ एका ठेक्याच्या मंजुरीपुरता मर्यादित नव्हता. त्यातून महापालिका क्षेत्रातील तीन शहरांमधील विकासाचा असमतोल, निधी आणि सुविधांच्या वाटपाबाबतची नाराजी तसेच स्थानिक राजकीय वर्चस्वाची स्पर्धा उघड झाली.

महापालिका क्षेत्र ११८.१८ चौ. कि.मी. आहे. सध्या सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरात दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छता महापालिकेच्या यंत्रणेमार्फत होते. कायम, मानधन व रोजंदारीवर ११५४ स्वच्छता कर्मचारी, तसेच १३१ घंटागाड्या, कॉम्पॅक्टर, डंपर टिप्पर ट्रक, ट्रॅक्टर, डंपर प्लेसर, जेसीबी आदी वाहनांची कुमक आहे.

स्वच्छता ठेक्याचा पहिला प्रयोग मिरजेत राबविला जात आहे. हा विषय शुक्रवारी महासभेपुढे होता. मिरजेत स्वच्छतेचा ठेका राबविण्याऐवजी तो कुपवाडमध्ये राबवावा, अशी मागणी कुपवाडच्या नगरसेवकांनी केली. दरवर्षी महापालिकेवर एक कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. कुपवाडमध्ये विस्तारित भाग अधिक, डम्पिंग ग्राउंडचे अंतर जास्त आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने तेथे ठेक्याची अधिक गरज असल्याचे समर्थन करण्यात आले. यातून कुपवाडकर नगरसेवकांनी आपल्या शहराचा विकासाचा अनुशेष अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. मात्र मिरज शहरातच हा प्रयोग राबविला जावा, यावरून सर्वपक्षीय मिरजकर नगरसेवक आक्रमक होते. हा प्रयोग सांगलीत का नको, असा मुद्दाही काही नगरसेवकांनी उपस्थित केला. यातून पक्षीय राजकारण बाजूला पडून स्थानिक अस्मिता अधिक प्रभावी ठरत असल्याचे दिसले.

अखेर मिरज शहरासाठी पाच वर्षांच्या कालावधीचा २३.९५ कोटींचा ठेका मंजूर झाला. मात्र तीनही शहरांचा समतोल विकास झाला पाहिजे, हा मुद्दाही महासभेत पुढे आला. तीन शहरांचा समावेश असलेल्या महापालिकेत विकासाचे नियोजन, शहरनिहाय मागण्या आणि राजकीय दबावातून होणार, की नेमकी गरज पाहून होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मिरजेच्या स्वच्छता ठेक्याने महापालिकेतील शहरनिहाय असमतोलाची चर्चा पुन्हा केंद्रस्थानी आणली आहे. एका शहराला सुविधा मिळवून देताना दुसऱ्या शहराला वंचित असल्याची भावना निर्माण होणे, हे महापालिकेच्या एकात्मिक विकासाच्या संकल्पनेला निश्चितच मारक आहे. स्वच्छतेचा ठेका कोणत्या शहराला मिळाला, यापेक्षा तिन्ही शहरांना दर्जेदार स्वच्छता सेवा मिळवून देणे हे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.