

मिरज : शहरातील सांगलीकर मळा येथे घरफोडी करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या दोन चोरट्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून घरफोडीतील २० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सार्थक सुनील पवार (वय २०, रा. संजयनगर, सांगली) आणि अमीर हुसेन शेख (वय २२, रा. सहारा चौक, सांगली) अशी संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगलीकर मळा येथील रहिवासी श्रीनिवास कल्लाप्पा आगळगावे हे दि. ७ रोजी गावी गेल्याने त्यांचे घर बंद होते. मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सार्थक पवार आणि अमीर शेख हे या परिसरात टेहळणी करत होते. बंद घर पाहून दोघांनी कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला आणि घरातील २० हजार ६०० रुपयांचा ऐवज लांबवला.
घरफोडी करून पळून जात असतानाच गस्तीवर असलेल्या पोलिसांनी दोघांना रंगेहात ताब्यात घेतले. चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.