

मिरज : येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये असणाऱ्या माळी स्मशानभूमी ते मंडले पेट्रोलपंप रस्त्याच्या कामासाठी वेळा निधी देण्यात आला आहे. याबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाने महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रारीतून केली आहे.
महापालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक 5 मधील म्हैसाळ ओढा ते माळी स्मशानभूमी व रुईकर पाणंद ओढा ते वखारभाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंत रस्ता हॉटमिक्स करणे या कामासाठी 27 एप्रिल 2023 रोजी एक कोटी वीस लाख नऊ हजार तीनशे पस्तीस रुपये निधी मंजूर होऊन त्या कामाची वर्क ऑर्डर एस. एफ. चौगुले या ठेकादाराला देण्यात आली होती. सदर काम 2025 मध्ये चालू झाले. परंतु माळी स्मशानभूमी ते वखारभाग झोपडपट्टी काम पूर्ण झाले आहे. उर्वरित वखारभाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंतचे काम अपूर्ण आहे. त्यानंतर वखारभाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंत रस्ता मुरूमीकरण करण्यासाठी खासदार विशाल पाटील यांच्या फंडामधून 9 लाख 946 रुपये निधी 2025 - 2026 मध्ये मंजूर असून वर्क ऑर्डर सुद्धा दिली आहे. आता पुन्हा माळी स्मशानभूमी वखारभाग झोपडपट्टी ते मंडले पेट्रोल पंपापर्यंत रस्ता हॉटमिक्स करण्यासाठी सांगली, मिरज, कुपवाड स्थायी समितीने 1 कोटी 25 लाख 6113 रुपये इतका निधी मंजूर केला आहे.
आधी या रस्त्याला निधी मंजूर असून सुद्धा परत निधी मंजूर केला आहे. या रस्त्यासाठी इतका निधी आवश्यक आहे का? हे पण पाहावे लागेल. तसेच एस. एफ. चौगुले या ठेकेदाराने वर्क ऑर्डरप्रमाणे काम पूर्ण केले आहे की नाही, हे बघण्याची संपूर्ण जबाबदारी महापालिकेच्या मिरज बांधकाम विभागाची आहे. परंतु या कामाकडे बांधकाम विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, असे निदर्शनास येत आहे. अशाप्रकारे एकाच रस्त्यासाठी तीनवेळा निधी मंजूर होत असेल, तर जनतेचा पैसा विनाकारण वाया जात आहे. या सर्व प्रकाराची चौकशी होऊन योग्य ती कारवाई करावी.