

कुपवाड : पत्नीला नांदवण्याच्या कारणावरून जन्मदात्या आईचा निर्घृण खून केल्याप्रकरणी संशयित मुलगा जगदीश जीवन झेंडे (वय 28, रा. झेंडे मळा, मानमोडी) याला न्यायालयाने पाच दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. संगीता जीवन झेंडे या पती आणि मुलासह मानमोडी (ता. मिरज) येथील झेंडे मळ्यात राहत होत्या.
बुधवार, 15 एप्रिल रोजी सायंकाळी संगीता यांचे पती जीवन झेंडे हे नेहमीप्रमाणे रात्रपाळीच्या कामावर गेले होते. त्यावेळी घरात संगीता आणि त्यांचा मुलगा जगदीश हे दोघेच होते. जगदीशची पत्नी सोनाली हिला घरात ठेवण्यावरून या माय-लेकांत जोरदार भांडण झाले. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. घरात कोणी नसल्याची संधी साधून संतप्त जगदीशने संगीता यांचे नाक, तोंड आणि गळा दाबून त्यांची हत्या केली.
गुरुवारी सकाळी जीवन झेंडे कामावरून घरी परतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी संशयित आरोपी जगदीश झेंडे याला अटक करून शुक्रवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.