मिरज राडा प्रकरण : आणखी 10 जणांना अटक
मिरज : मिरज शहरात झालेल्या धुमश्चक्रीप्रकरणी आणखी 10 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या 23 वर पोहोचली आहे. याप्रकरणी समाज माध्यमावर अफवा पसरवणार्या 7 जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुरुवारी मिरजेत तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मंगळवारी रात्री भावना दुखावतील असे वक्तव्य केल्यानंतर धुमश्चक्री उडाली. यानंतर संबंधित तरुणास अटक करण्यात आली. जिल्ह्यात जमावबंदी आदेश असतानाही बेकायदेशीररित्या जमाव जमवून एका गटाने धुडगूस घातला. याप्रकरणी सुमारे दीडशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 35 जणांची नावे निष्पन्न झाली होती. बुधवारी 13 जणांना अटक करण्यात आली होती, तर गुरुवारी आणखी 10 जणांना अटक करण्यात आली. त्यामुळे आता अटक करण्यात आलेल्यांची संख्या 23 वर पोहोचली आहे.
अन्य संशयितांचा शोध पोलिस घेत आहेत. अटक करण्यात आलेल्यावर सामाजिक शांततेचा भंग आणि जिल्हाधिकार्यांच्या जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच समाज माध्यमावर मिरजेतील घटनेची अफवा पसरवणार्या 7 जणांना अटक करण्यात आली आहे. मिरजेत घडलेल्या घटनेचा विपर्यास करून पुन्हा सामाजिक शांतता भंग होईल, असे कृत्य 7 जणांनी केले होते. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.दरम्यान, मिरजेत मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाची एक तुकडी, दंगल नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या, मिरज डिव्हिजनमधील बंदोबस्त, जिल्ह्यातील अतिरिक्त बंदोबस्त मिरजेत तैनात करण्यात आला आहे.
गुरुवारी सायंकाळी पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या नेतृत्वात शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीमध्ये एका समाजातील प्रतिष्ठित नागरिकांना बोलावण्यात आले. समाजातील सर्व घटकांना शांत राहण्याचे आवाहन करावे, असे आवाहन अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी केले.
सर्व सहभागी रडारवर
मिरजेत मंगळवारी रात्री झालेल्या धुमश्चक्रीत सहभागी सर्व संशयितांचे मोबाईल नंबर मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याआधारे सर्व संशयितांची पडताळणी करण्याचे काम सुरू आहे. हे सर्व संशयित पोलिसांच्या रडारवर आहेत.

