

जालिंदर हुलवान
मिरज : रक्षाबंधन म्हणजे भावा-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा आणि भावनेचा पवित्र सण. या दिवशी बहिणीच्या हातातील राखी भावाच्या मनगटावर सजते आणि भाऊ तिच्या रक्षणाचे वचन देतो. मात्र, देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या कुटुंबांसाठी हा दिवस आनंदासोबत विरहाची वेदनाही घेऊन येतो. अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी आहे शिरढोण (ता. शिरोळ) येथील 'बीएसएफ' जवान स्वप्निल हेरवाडे आणि मिरजेत सासर असलेल्या त्यांच्या भगिनी स्वाती प्रदीप कोरे यांची.
गेल्या १६ वर्षांपासून स्वप्निल हेरवाडे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत आहेत. सध्या पश्चिम बंगाल सीमेवर तैनात असलेल्या स्वप्निल यांनी देशसेवा हेच सर्वोच्च कर्तव्य मानले आहे. सीमेवर पहारा देणाऱ्या हजारो जवानांमुळेच देशातील नागरिक सण-उत्सव आनंदाने साजरे करू शकतात. मात्र, यासाठी या जवानांच्या कुटुंबीयांना विरहाची मोठी किंमत मोजावी लागते. १६ वर्षांच्या या प्रदीर्घ कालावधीत स्वप्निल आणि स्वाती यांनी केवळ एकदाच प्रत्यक्ष भेटून रक्षाबंधन साजरे केले आहे. उर्वरित सर्व वर्षे व्हिडीओ कॉल किंवा फोनवरूनच या भावा-बहिणीने नात्याचा पवित्र धागा जपला.
स्वप्निल यांना मिरजेत येणे शक्य नव्हते. त्यामुळे स्वाती यांनी व्हिडीओ कॉलद्वारे भावाशी संपर्क साधला. मोबाईल स्क्रीनवर समोर भाऊ दिसत होता आणि मिरजेत बहिणीच्या हातात राखी होती. प्रत्यक्ष राखी बांधता आली नाही तरी, भावाच्या मनगटासाठी आणलेली राखी स्क्रीनवर दाखवत स्वाती यांनी आपले प्रेम व्यक्त केले. त्या काही मिनिटांच्या संवादात १६ वर्षांच्या आठवणी, भावाबद्दलची काळजी आणि देशसेवेचा अभिमान या साऱ्या भावना दाटून आल्या होत्या.
बहिणीला भावाच्या सुरक्षिततेची काळजी असते, तर भावाला देशाच्या सीमेची. आपला भाऊ हजारो कुटुंबांच्या रक्षणासाठी सीमेवर उभा आहे, ही भावना मनातील विरहाच्या वेदनेवर मात करते, असा अभिमान स्वाती यांनी व्यक्त केला.