मिरज : रेल्वेत लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, जातीवाचक अपमान करून तिला धमकावल्याप्रकरणी मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात दोन वरिष्ठ रेल्वे अभियंत्यांविरुद्ध ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीप कुमार शंभू शरण मिश्रा (वय ५३, रा. सुंदरनगर, मिरज) आणि युवराज स्वामी (वय ४५, सी अँड डब्ल्यू कार्यालय, मिरज रेल्वे स्थानक) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कार्यालयात काम करत असताना दोन्ही अधिकाऱ्यांकडून तिच्यावर लैंगिक स्वरूपाच्या टिपण्या करणे व गैरवर्तन करण्याचे प्रकार सुरू होते. या त्रासाला कंटाळून तिने रेल्वे प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली होती. चौकशीअंती एका अधिकाऱ्याची पुणे येथे बदली करण्यात आली, तर पीडित महिलेची फिल्डवर नेमणूक करण्यात आली.
फिल्डवर काम करत असताना तेथील इन्चार्ज संदीपकुमार मिश्रा यांनी महिलेचा जातीवाचक अपमान केला. तसेच युवराज स्वामी याने, ‘तुझ्या तक्रारीमुळे एका अधिकाऱ्याची बदली झाली; आमचे ऐकले नाहीस तर तुझी बदली बिनपाण्याच्या गावी करू’, अशी धमकी दिली. २६ नोव्हेंबर २०२५ पासून कार्यालयात व फिल्डवर हा मानसिक व लैंगिक छळ सुरू होता.
याबाबत पीडितेने वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली होती; मात्र तेथून कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर तिने मिरज रेल्वे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी रेल्वे पोलिस अधिक तपास करत आहेत.