

मिरज : पहलगाम हल्ल्यानंतर रेल्वे सुरक्षा दल अलर्ट मोडवर आले आहे. उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेमध्ये प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. सर्व रेल्वेगाड्या फुल्ल आहेत. यामुळे सर्व रेल्वे गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने सुरक्षारक्षकांची वाढ केली आहे. संवेदनक्षम असणार्या मिरज जंक्शनची श्वानपथकाकडून तपासणी करण्यात येत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील सर्वच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने रेल्वे सुरक्षा दलदेखील अलर्ट मोडवर आहे. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातदेखील रेल्वेत आणि रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढविण्यात आली आहे. पुणे विभागाच्या अखत्यारीत येणारे मिरज जंक्शन हे देखील संवेदनक्षम जंक्शन आहे. हे जंक्शन महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर येत असल्यामुळे रेल्वे सुरक्षा दलाने सुरक्षेत वाढ केली आहे. मिरजमार्गे उत्तर भारत आणि दक्षिण भारतात जाणार्या सर्व रेल्वेगाड्यांमध्ये सुरक्षा जवानांची संख्या वाढविण्यात आली आहे. मिरज जंक्शनमध्ये हत्यारबंद सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. उन्हाळी सुट्यांमुळे रेल्वेगाड्या आणि जंक्शनवर प्रवाशांची गर्दी वाढल्यामुळे या ठिकाणी बॉम्बशोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली. यावेळी मिरज जंक्शनमधील सर्व विभागांसह प्रवाशांच्या बॅगांची श्वानपथकाकडून तपासणी करण्यात आली.
मिरज रेल्वे जंक्शनमध्ये येणार्या प्रवाशांच्या बॅगांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच रेल्वे गाड्यांमध्ये देखील ज्या बॅगांचा संशय असेल, अशा सर्व बॅगांची श्वानपथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडील आणि सांगली जिल्हा पोलिस दलाकडील श्वानपथकांची मदत घेतली जात आहे.