

मिरज : रिल्स बनवण्याच्या नादात पुणे ते हुबळी वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करून काचा फोडणार्या तिघा अल्पवयीन मुलांना मिरजेत रेल्वे सुरक्षा दलाने ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरज रेल्वे स्थानकाजवळ हा प्रकार घडला होता.
चार दिवसांपूर्वी पुण्यातून हुबळीला जाणारी वंदे भारत एक्स्प्रेस मिरजेतून सुटल्यानंतर गाडीवर दगडफेक झाल्याने सी वन बोगीच्या खिडकीची महागडी काच फुटली. गाडीतील रेल्वे कर्मचार्यांनी याबाबत हुबळी रेल्वे नियंत्रण कक्षाला माहिती दिली. ‘वंदे भारत’च्या बोगीवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यात मिरजेत तीन अल्पवयीन मुले रेल्वे मार्गालगत बसलेली असून त्यांनी गाडीवर दगडफेक केल्याचे दिसले. धावत्या रेल्वेतील कॅमेर्यातून चित्रित झालेले दगडफेकीचे ठिकाण मिरजेतील म्हैसाळ रोड परिसरात असल्याचे दिसून आले, मात्र दगडफेक करणार्या मुलांचे चेहरे ओळखू येत नव्हते. रेल्वे सुरक्षा दलाने म्हैसाळ रोड परिसरात रेल्वे मार्गालगत असलेल्या वसाहतीत शोध घेऊन दगडफेक करणार्या मुलांना शोधून काढले. तिघेही अल्पवयीन असून मोबाईलवर रिल्स बनवण्यासाठी ते रेल्वे मार्गावर गेले होते. यावेळी आलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’वर गंमत म्हणून त्यांनी दगडफेक केल्याचे निष्पन्न झाले.