

प्रभाग क्र. 3
जालिंदर हुलवान : मिरज
मिरजेतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये हाय व्होल्टेज लढत होणार आहे. येथे वनखंडे, आवटी, दुर्वे, जाधव, दोरकर, चौधरी असे राजकारणातील दिग्गज कुटुंबातील सदस्य उमेदवार म्हणून लढत आहेत. भाजपचे आमदार सुरेश खाडे आणि शिवसेनेचे नेते मोहन वनखंडे यांच्यातील वाद हा सध्या सुरू असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये सुरुवातीपासून दिसला. तशी राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे शिवसेना युतीत आहे. त्यामुळे या प्रभागात युती करण्यावरून घमासान सुरू होते. खाडे यांनी वनखंडे यांच्या उमेदवारीला थेट विरोध केल्याने हा वाद पुन्हा उफाळला आणि अखेर युती तुटली.
प्रभाग क्रमांक तीन हा तसा जुना काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र या प्रभागातून 2018 मध्ये भाजपचे चार नगरसेवक निवडून आले होते. मोहन वनखंडे यांच्या पत्नी अनिता वनखंडे, सुरेश आवटी यांचे पुत्र संदीप आवटी, माजी नगरसेवक दिगंबर जाधव यांच्या आई शांता जाधव आणि शिवाजी दुर्वे असे चार भाजपचे उमेदवार निवडून आले होते. त्यावेळचे राजकारण वेगळे होते. आता मात्र हे राजकारण वेगळे आहे. वनखंडे हे खाडेंपासून दूर झाले. मात्र दिगंबर जाधव हे खाडे यांच्यासोबतच होते. उमेदवारी फायनल होताना मात्र दिगंबर जाधव यांना उमेदवारी न देता भाजपने दुसरा उमेदवार दिला. त्यामुळे दिगंबर जाधव यांनी ऐनवेळी अजित पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये दिगंबर जाधव आणि संदीप आवटी हे एकाच पॅनेलमध्ये उभारून निवडून आले होते. आता मात्र या दोघांमध्येच थेट लढत होत आहे. दोघेही तुल्यबळ असल्याने येथे जोरदार लढत होणार आहे.
वनखंडे यांनी त्यांचे पुत्र सागर वनखंडे यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून उमेदवारी दिली आहे. सागर वनखंडे यांच्याविरोधात सुनीता व्हनमाने या भाजपकडून, तर अर्चना चाको या उबाठा गटातून लढत आहेत. वनखंडे आणि व्हनमाने यांच्यामध्ये अगदी निवडणुकीच्या सुरुवातीलाच पोलिस ठाण्यापर्यंत वाद गेला. त्यामुळे या भागात पोलिसांचा वॉच कायम राहणार आहे. वनखंडे यांचा मुत्सद्देगिरीपणा ज्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिसला, तसाच मुत्सद्देगिरीपणा या निवडणुकीत दिसतो का? हे बघावे लागणार आहे. या प्रभागातील तिसरी लढत ही माजी नगरसेवकांच्या तीन कुटुंबांमध्ये होत आहे. इब्राहिम चौधरी यांचे घराणे राजकारणात प्रसिद्ध आहे. ते स्वतः, त्यांच्या पत्नी, त्यांची दोन्ही मुले हे चारही यापूर्वी नगरसेवक म्हणून निवडून गेले होते. या निवडणुकीत मात्र माजी नगरसेवक जुबेर चौधरी यांच्या पत्नी रेश्मा चौधरी या अजितदादा राष्ट्रवादी गटातून लढत आहेत.
माजी नगरसेवक अजित दोरकर हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे आहेत. मात्र या निवडणुकीत त्यांच्या पत्नी शशिकला दोरकर या भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. याच प्रभागात माजी नगरसेवक सज्जाद भोकरे यांची कन्या ही देखील लढत आहे. त्यामुळे येथेही तिरंगी लढत दिसणार आहे. या प्रभागातील चौथी लढत देखील जोराची होणार आहे. 2018 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसमधून सचिन जाधव यांनी त्यावेळी भाजपचे उमेदवार संदीप आवटी यांना जोराची टक्कर दिली होती. आता जाधव हे आवटी गटात गेले आहेत. त्यामुळे जाधव यांनी या निवडणुकीत भाजपची उमेदवारी मिळवली आणि त्यांच्या पत्नी छाया जाधव यांना उभे केले. जाधव यांची लढत माजी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांच्या पत्नी शैला दुर्वे यांच्याशी होणार आहे. शिवाजी दुर्वे हे यापूर्वी चारवेळा निवडून गेले आहेत. त्यामुळे जाधव विरुद्ध दुर्वे ही देखील लढत जोरदारपणे बघायला मिळणार आहे.
मतदारांनी ठरवायचं...
घराणेशाही जपली जाते, ती वाढवली जाते, पार नातवंडं, परतवंडं बघता-बघता नेते होतात. मिसरूडही न फुटलेल्या वारसांना साहेब, दादा, भैया, आबा, आप्पा म्हणावे लागते. आई, ताई, माई, आक्कासाहेब वगैरे म्हणावे लागते. दोष त्यांचा नसतो, आपला जास्त असतो. आपण त्यांना स्वीकारतो, नाकारायचा अधिकार आपल्या हाती असला तरी. नाकारलं तर विषय संपला. लोच्या असा असतो, की आपलं अज्ञान हेच त्यांचं अचाट भांडवल असतं.