

मिरज : मिरज पोलिस उपअधीक्षक कार्यालयाकडे नियुक्तीस असणारे सहायक उपनिरीक्षक बाळू मुसा डांगे (वय 55, मूळ गाव आरळा, ता. शिराळा, सध्या रा. सांगली) यांचा मृतदेह शुक्रवारी संशयास्पदरीत्या आढळून आला. त्यांनी आत्महत्या केली की अन्य कोणत्या कारणातून त्यांचा मृत्यू झाला, हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.
याबाबत अधिक माहिती अशी, बाळू डांगे हे सध्या सहायक उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांची नियुक्ती मिरज वाहतूक शाखेकडे होती. परंतु, सध्या ते प्रतिनियुक्तीवर मिरज पोलिस उपअधीक्षक कार्यालयात नियुक्तीस होते. बाळू डांगे हे शुक्रवारी दुपारपासून संपर्काबाहेर होते. पोलिस कार्यालयातील सहकारी तसेच कुटुंबातील सदस्य यापैकी कोणाचाही फोन ते घेत नव्हते. त्यामुळे शुक्रवारी दुपारपासून कुटुंबीय व नातेवाईक त्यांचा शोध घेत होते. पण ते सापडत नसल्याने त्यांचे मोबाईल लोकेशन शोधण्यात आले.
मिरज-पंढरपूर रस्त्यावरील भोसे येथे त्यांचे मोबाईल लोकेशन मिळून आले. तातडीने कुटुंबातील सदस्यांनी भोसे येथे धाव घेतली. त्यावेळी बाळू डांगे हे त्यांच्या मोटारीत बेशुद्ध अवस्थेत मिळून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. परंतु त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणातून झाला, हे रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच पोलिस अधीक्षक संदीप घुगे, उपअधीक्षक प्रणील गिल्डा, मिरज शहरचे निरीक्षक किरण चौगुले, महात्मा गांधी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांच्यासह मोठा फौजफाटा मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाला.