

मिरज : मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक सुनील गुरव याला सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारदारांकडून सहा लाख रुपये लाच घेताना अटक केली. या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली होती. रात्री उशिरा सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून याबाबत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
सहायक निरीक्षक सुनील गुरव याच्याकडे मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात मालगाव परिसराचा कार्यभार आहे. काही दिवसापूर्वी पोलिसात दाखल गुन्ह्यात तक्रारदारास आरोपी न करण्यासाठी गुरव याने तक्रारदाराकडे सहा लाख रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने सांगली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार पथकाने काल मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात गुरव यास पकडण्यासाठी सापळा लावला होता. सायंकाळी सहा वाजता पोलिस ठाण्यासमोर असलेल्या एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून सहा लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरव यास पकडले. याबाबत मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळाली.