

मिरज : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरज पोलिस ॲक्शन मोडवर आले असून यंदाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये एक बेस एक टॉपलाच परवानगी देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास मंडळावर कठोर कारवाई करून डीजे सिस्टीम जप्त करण्यात येणार आहे. तसेच गुन्हेगारांचे फोटो असलेल्या पोस्टरला कोणत्याही परिस्थितीत परवानगी देण्यात येणार नाही. जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक अजय कोकाटे यांनी सांगितले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मिरज शहर पोलिसांनी शांतता कमिटी व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत वेळी एक बेस एक टॉपलास परवानगी देण्यात आली. तसेच ज्या मंडळाकडून गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीमध्ये फलक लावण्यात येणार त्याची काटेकोरपणे मिरज पोलिसांकडून तपासणी केली जाणार आहे. गुन्हेगार तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा पोस्टवर फोटो आढळल्यास पोस्टर लावणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. बैठकीस मिरज शहर पोलिस निरीक्षक किरण चौगले, मिरज वाहतूक शाखेचे सहायक रणजित तिप्पे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
...तर संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल होणार
गणेशोत्सवाच्या नावाखाली नागरिक व्यापारी किंवा दुकानदारांकडून जबरदस्तीने वर्गणी मागणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. तसेच असे प्रकार आढळून आल्यास संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान आगामी गणेशोत्सवामध्ये पारंपारिक वाद्यांना पसंती द्यावी, असे आवाहनही मिरज शहर पोलिसांकडून करण्यात आले.