

मिरज : आपत्कालीन रुग्णवाहिकेत डॉक्टरांकडून वेळेत उपचार न मिळाल्याने एका रुग्णाचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. अमोल प्रकाश कुंभार (वय 36, रा. देशिंग, ता. कवठेमहांकाळ) असे मृताचे नाव आहे. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच अमोल यांचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप मिरज शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह मृताच्या आईने केला.
अमोल कुंभार यांची शुगर अचानक कमी झाल्याने शनिवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांच्या ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेला फोन केला. काही वेळातच रुग्णवाहिका दाखल झाली. यावेळी अमोल स्वतः चालत रुग्णवाहिकेत गेले होते. परंतु, प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेमध्ये त्यांच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे असताना, रुग्णवाहिकेतील डॉक्टर पाठीमागे रुग्णाजवळ बसण्याऐवजी पुढे चालक केबिनमध्ये जाऊन बसले. रुग्णाकडे झालेल्या दुर्लक्षामुळे मिरज शासकीय रुग्णालयात पोहोचेपर्यंत अमोल कुंभार हे पूर्णपणे बेशुद्ध झाले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असता अमोल कुंभार यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. रुग्णवाहिकेमध्येच त्यांना वेळेत प्रथमोपचार मिळाले असते तर त्यांचा जीव वाचला असता, असा आरोप मिरज शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश सकट आणि अमोल यांच्या आईने केला आहे. तरुण मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने त्यांच्या आईने रुग्णालयात हंबरडा फोडला होता.