Miraj News : मिरज पंचायत समितीची सभा 2 तास खोळंबली

उद्घाटनाविनाच नव्या सभागृहात सभा घेतल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये वाद; सदस्य आक्रमक
Miraj News
मिरज पंचायत समितीची सभा 2 तास खोळंबली
Published on
Updated on

मिरज : मिरज पंचायत समितीमधील नव्या प्रशासकीय इमारतीच्या सभागृहामध्ये अचानकपणे सभा घेतल्याने सत्ताधारी दोन्ही काँग्रेस व भाजप सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यामुळे काल, गुरुवारी आयोजित करण्यात आलेली सभा सुमारे दोन तास खोळंबली. अखेर पुढची सभा होईपर्यंत उद्घाटन न झाल्यास नव्या इमारतीमध्येच बैठक घेण्याचा ठराव या सभेत करण्यात आला.

निवडणुका झाल्यानंतर मिरज पंचायत समितीची पहिली सर्वसाधारण सभा दि. 9 एप्रिल 2026 रोजी पंचायत समितीच्या पद्मभूषण वसंतरावदादा पाटील सभागृहामध्ये घेण्यात आली होती. याच पंचायत समितीच्या आवारामध्ये नवी प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. याच ठिकाणी बैठकीसाठी नवे सभागृहदेखील उभारण्यात आले आहे. नव्या सभागृहामध्येच बैठक घेण्याची विनंती पहिल्याच बैठकीत काही सदस्यांनी केली होती. मात्र उद्घाटन न झाल्याने तेथे सभा झाली नव्हती. मंगळवारी समितीची दुसरी सभाही पद्मभूषण वसंतरावदादा पाटील सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती. तशी सर्वसाधारण सभेची नोटीस गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके व सभापती तन्वी कमलेकर यांच्या सहीने देण्यात आली होती. मात्र या सभागृहामध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याने नव्या प्रशासकीय इमारतीमधील सभागृहामध्ये ही सर्वसाधारण मासिक सभा आयोजित करण्यात आली.

दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही सभा सुरू झाली. सभा सुरू होताच भाजपचे सदस्य किरण बंडगर, विष्णू पाटील यांनी, नव्या वास्तूचे उद्घाटन न झाल्याने येथे सभा का आयोजित केली? असा प्रश्न उपस्थित करत ‌‘आम्ही सभागृहातून बाहेर निघून जातो‌’, असा पवित्रा घेतला. मात्र या ठिकाणी उपस्थित पाणीपुरवठा सचिव किरण सायमोते यांनी ‌‘जुन्या सभागृहामध्ये काही वेळाने सभा घेऊ‌’ असे सांगितले. त्यामुळे भाजपचे सदस्य तिथून निघून गेले. मात्र काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्या सुप्रिया तवटे, सुजाता पाटील, संयोगिता कोळी, स्नेहल पाटील, रीदा मुजावर, गायत्री घोरपडे यांच्यासह अन्य सदस्यांनी, नव्या सभागृहातच सभा घ्यावी, अन्यत्र कोठेही सभा घेऊ नये, असे सांगून नव्या सभागृहातच ठाण मांडले. इतरत्र सभा घेतल्यास आम्ही येणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. यामुळे पेच निर्माण झाला. सभा कोठे घ्यायची यावर खलबते सुरू झाली. सुमारे दोन तासाच्या अवधीनंतर जुन्या सभागृहामध्येच सभा घेण्याचे ठरले. त्यानंतर सर्व सदस्य, अधिकारी जुन्या सभागृहात आले. अर्ध्या तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते या सभागृहाचे उद्घाटन करायचे आहे, त्यांची वेळ मिळालेली नाही. त्यांची वेळ मिळाली की उद्घाटन करून नव्या सभागृहात कामकाज सुरू करू, असा पवित्रा भाजपच्या सदस्यांनी घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news