

मिरज : सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या मिरजेतील प्रभाग क्रमांक २० च्या नगरसेविका आणि प्रभाग समिती क्रमांक चारच्या सभापती अश्विनी कोळी यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने ते जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचे महापालिकेचे सदस्यपद रद्द करण्यात आल्याचे अधिकृत पत्र आयुक्त संजीता महापात्र यांनी जारी केले आहे.
कोळी या अनुसूचित जमाती प्रवर्गातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढल्या होत्या. या प्रभागात जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे माजी नगरसेविका स्वाती पारधी आणि शिवसेनेचे विकास सूर्यवंशी यांच्यात तिरंगी लढत झाली होती. यामध्ये सूर्यवंशी दुसऱ्या क्रमांकावर, तर पारधी तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते आणि कोळी या विजयी झाल्या होत्या. निवडून आल्यानंतर त्या महापालिकेच्या मागासवर्गीय समितीवर सदस्य म्हणून गेल्या, तसेच मिरजेतील प्रभाग समिती क्रमांक चारच्या सभापतीपदी त्यांची निवड झाली होती.
कोळी यांचे लग्नापूर्वीचे नाव अश्विनी दत्तात्रय कांबळे असे होते. त्यांनी पंढरपूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून 'कोळी महादेव' अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळवले होते आणि त्याचा वापर निवडणुकीसाठी केला होता. मात्र, हे जात प्रमाणपत्र बोगस असल्याची तक्रार पुणे विभागाच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समितीकडे दाखल केली होती.
सभापतीपदही आपोआपच संपुष्टात
कोळी यांचे नगरसेवकपद रद्द झाल्यामुळे प्रभाग समिती क्रमांक चारचे त्यांचे सभापतीपदही आता आपोआपच संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता या प्रभागात नगरसेवकपदासाठी पुन्हा फेरनिवडणूक लागण्याची चिन्हे आहेत.