Miraj News : मिरज कार्यालयात आयुक्तांकडून अचानक झाडाझडती

बांधकाम विभागातील अभियंत्यासह कर्मचारी गायब : ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्याचे आदेश
Miraj News
मिरज कार्यालयात आयुक्तांकडून अचानक झाडाझडती
Published on
Updated on

मिरज : सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता महापात्र यांनी बुधवारी अचानकपणे मिरज विभागीय कार्यालयात भेट देऊन सर्व विभागांची झाडाझडती घेतली. बांधकाम विभागातील अभियंत्यांसह काही कर्मचारी गैरहजर होते. याची गंभीर दखल घेत त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्त महापात्र यांनी सहायक आयुक्त अनिस मुल्ला यांना दिले. यावेळी उपायुक्त अश्विनी पाटील उपस्थित होत्या.

बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयामध्ये अचानक आयुक्तांचे वाहन दाखल झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ सुरू झाली. आयुक्त अचानकपणे आल्याने कर्मचाऱ्यांना काय करावे, हेच कळेना. आयुक्त महापात्र यांनी पहिल्यांदा घरपट्टी आणि बारनिशी विभागात जाऊन कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. त्यानंतर बांधकाम विभागात प्रवेश केला. या ठिकाणी एकच कर्मचारी उपस्थित होता. त्यानंतर आयुक्त महापात्र यांनी हालचाल रजिस्टरची तपासणी केली. त्यामध्ये कोणत्याही नोंदी नव्हत्या. बहुतांश अभियंते व कर्मचारी कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे आयुक्त महापात्र यांनी सहायक आयुक्त मुल्ला यांना या सर्वांना ‘कारणे दाखवा’ नोटीस काढण्याचे आदेश दिले.

त्यानंतर आयुक्त नगररचना विभागात गेल्या. तेथेही कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. कर्मचाऱ्यांची ओळख परेडदेखील घेतली. या ठिकाणी ज्या टेबलवर कर्मचारी उपस्थित होते, त्यांना नेमप्लेट व त्या टेबलवर बसणाऱ्या कर्मचाऱ्यांची कामे काय आहेत, याची माहिती फलकावर लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर आयुक्त महापात्र आरोग्य विभागामध्ये गेल्या. तेथेही कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. काही नागरिकांनीदेखील आयुक्तांकडे तक्रारी केल्या. यावेळी भाजपचे नगरसेवक दयानंद खोत यांनीदेखील जन्माचे दाखले वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली. मात्र ऑनलाईन पद्धतीमुळे हा विलंब होत असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

त्यानंतर आयुक्त महापात्र यांनी मिरजेच्या वखारभाग येथील ड्रेनेज पंपिंग स्टेशनची पाहणी केली. येथील कामकाजासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी मार्केट परिसरातील महापालिकेच्या दवाखान्याची पाहणी केली. गेल्या आठवड्यात घडलेल्या अर्भक मृत्यू प्रकरणातील प्रसूती विभागालाही त्यांनी भेट दिली. त्यानंतर शाळा नंबर ७ येथे भेट देऊन पाहणी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news