

सांगली : मिरजेतील जुना माधवनगर रस्त्यावर गुरुवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत १६ चाकी इंधन टँकर, दोन दुचाकी आणि पत्र्याचे पार्किंग शेड जळून खाक झाले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. टँकर रिकामा असल्याने मोठी जीवितहानी टळली.
प्राथमिक माहितीनुसार आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असला, तरी या परिसरातील कथित इंधन तस्करीच्या पार्श्वभूमीवर विविध चर्चांना उधाण आले आहे. जीवन राजपूत यांच्या शेडमध्ये उभ्या असलेल्या टँकरला आग लागल्यानंतर काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. टँकरचे १६ टायर एकामागून एक फुटल्याने परिसरात मोठे स्फोट झाल्यासारखे आवाज झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
पोलिस व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. मिरज रेल्वे स्थानकाजवळ इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमचे इंधन डेपो आहेत. येथून अनेक जिल्ह्यांना इंधनाचा पुरवठा केला जातो. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही टँकर खासगी शेडमध्ये थांबत असून तेथे इंधनाची बेकायदेशीर हाताळणी होत असल्याची चर्चा आहे. आग लागलेल्या शेडमध्ये इंधनाचे कॅन असल्याने आग अधिक भडकली असावी, अशीही चर्चा आहे.
हायटेक 'जीपीएस' यंत्रणेलाही सुरुंग!
इंधन चोरी रोखण्यासाठी टँकरमध्ये जीपीएस यंत्रणा बसविली असली, तरी जीपीएस यंत्रणा बंद करून किंवा जॅमरचा वापर करून करून टँकर खासगी शेडमध्ये नेले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या प्रकाराकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचाही संशय आहे.
अशी चर्चा का होते?
डेपोमधून इंधन भरून निघणारे अनेक टँकर महामार्गावर जाण्यापूर्वी जुना माधवनगर रस्त्यावरील काही खासगी शेड्समध्ये छुप्या पद्धतीने थांबतात. किरकोळ दुरुस्तीच्या नावाखाली उभारलेल्या या शेड्समध्ये टँकरमधून पेट्रोल-डिझेल बेकायदेशीरपणे काढले जाते, अशी चर्चा का होते?
यंत्रणांचे ‘अर्थपूर्ण' दुर्लक्ष?
मिरजेत इंधन तस्करीचे हे रॅकेट अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू आहे. टँकरमधून इंधन चोरणारे तस्कर मोकाट फिरत आहेत. पुरवठा विभाग, पोलिस प्रशासन आणि पेट्रोलियम कंपन्यांचे सुरक्षा पथक या सर्वच यंत्रणांचे या बेकायदेशीर कृत्याकडे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्याचा संशय आहे. या भीषण आगीच्या निमित्ताने आतातरी प्रशासनाला जाग येणार का? आणि या इंधन तस्करांच्या मुख्य सुत्रधारांवर कडक कारवाई होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.