Miraj Politics : मिरज पं. स. इमारतीचे सत्ताधाऱ्यांकडून उद्‌घाटन

मंत्र्यांच्या एक दिवस आधी जयंतरावांनी कापली फीत
Jayant Patil
Jayant Patil
Published on
Updated on

मिरज : मिरज पंचायत समितीच्या नव्याने बांधण्यात आलेल्या प्रशासकीय इमारतीच्या उद्‌घाटन कार्यक्रमावर सत्ताधाऱ्यांनी बहिष्कार टाकला आणि या सत्ताधाऱ्यांनी शनिवारी माजी मंत्री व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्याहस्ते उद्‌घाटन केले. याच इमारतीचे आज, रविवारी सायंकाळी भाजपकडून ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्याहस्ते उद्‌घाटन होणार आहे.

मिरज पंचायत समितीच्या आवारामध्ये नव्याने प्रशासकीय इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे उद्‌घाटन ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मिरजेचे आमदार सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी होणार आहे. या कार्यक्रमाची कोणतीही माहिती प्रशासनाकडून न देता, कार्यक्रमाविषयी विश्वासात न घेता प्रशासनाने त्याची तयारी केल्याने शनिवारी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षांच्या अकरा सदस्यांनी एकत्रित येऊन शनिवारी उद्‌घाटनाचा कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके गैरहजर होते, त्यांचा मोबाईल देखील बंद होता. माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्याहस्ते या इमारतीचे फीत कापून उद्‌घाटन झाले.

नव्या इमारतीतून न्याय मिळेल : जयंतराव

आ. जयंत पाटील म्हणाले, एक चांगली इमारत पंचायत समितीच्या आवारामध्ये उभी राहिलेली आहे. सर्वांनाच न्याय देण्याचे काम नवे सदस्य करतील.

दडपाल तर उफाळून येईल : घोरपडे

माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, आजचा हा उद्‌घाटन कार्यक्रम घेऊन लोकशाही जागृत आहे हे तुम्ही सर्वांनी दाखवून दिले आहे. या प्रशासकीय इमारतीचे उद्‌घाटन हे लोकशाही मार्गाने होत आहे. या कार्यक्रमाची माहिती दिल्लीपर्यंत जावी अशी माझी इच्छा आहे. एखाद्या गोष्टीत दडपण्याचा प्रयत्न झाला, तर जनता उफाळल्याशिवाय राहत नाही. पक्षातील एका सदस्यासाठी पूर्ण बळ देण्याचे काम चालले आहे का? हे मी त्या देशाच्या मोठ्या पक्षाच्या प्रमुखांना देखील सांगू इच्छितो, याचा अभ्यास त्यांनी करावा. असे प्रकार थांबले पाहिजेत. या उद्घाटनाचा कार्यक्रम जनतेने हातात घेऊन चांगला केला. मिरजेसारख्या शहरात पेटलेली ठिणगी ही देशभर जाऊ शकते याचा विचार देखील झाला पाहिजे.

आमची सत्ता आली की भ्रष्टाचार खणून काढू : विशाल पाटील

खासदार विशाल पाटील म्हणाले, शासनाने दिलेला निधी हा जनतेचा नाही, तर आपला आणि आपल्या बापाचा निधी आहे, अशी भावना सध्याच्या राज्यकर्त्यांमध्ये आहे. त्यांच्या कोणाच्याही वैयक्तिक इस्टेटीमधून तयार झालेली ही इमारत नाही, तर जनतेच्या पैशातून निधीतून ही इमारत उभारली आहे. या कामाला वेगवेगळ्या सरकारांनी मान्यता व निधी दिला आहे. काँग्रेसच्या काळात देखील या कामाला मान्यता देण्यात आलेली होती. या जिल्ह्यामध्ये कामांचे उद्घाटन करताना पालकमंत्री आणि तिथला एखादा आमदार हे दोघेच जाऊन कामाचे उद्घाटन करतात, असा प्रकार जतमध्ये देखील घडला आहे. आटपाडीतील शिवसेनेच्या स्थानिक आमदाराला देखील बोलावले नाही. आम्हीच तुम्हाला या कामाच्या निमित्ताने निधी दिला आहे, अशी भावना यांच्यामध्ये निर्माण झाली आहे, हे चुकीचे आहे. पंचायत समितीमधील प्रशासनानेही सदस्यांना चुकीची वागणूक दिली. यापूर्वी केलेल्या चुकीचे पांघरूण सध्याचे भाजपचे सरकार घालत असेल. मात्र आमची सत्ता आली की यांनी केलेला प्रशासकीय काळातील भ्रष्टाचार निश्चितपणे काढू.

यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, शिवसेनेचे मोहन वनखंडे, सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता शेजूळ, राष्ट्रवादीच्या सुप्रिया तवटे, संगीता कोळी, स्नेहल पाटील, अरविंद सपकाळ, शोभा मोहिते, सूरज मगदूम, रिदा मुजावर, गायत्री घोरपडे, नगरसेवक अतहर नायकवडी आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news