

मिरज: मिरजेतील महापालिकेच्या प्रसूती गृहातील शौचालयात मृतावस्थेत पुरुष अर्भक सापडल्याने खळबळ उडाली आहे. प्रसूती गृहातील शौचालयातून दुर्गंधी येऊ लागल्याने तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे मिरजेत प्रसूतीगृह आहे. या प्रसूती गृहामध्ये गुरुवारी सायंकाळी दुर्गंधी येऊ लागल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्याकडून तपासणी करण्यात आली. यावेळी शौचालयामध्ये सात महिन्याचे पुरुष अर्भक मिळून आले. याबाबतची माहिती तातडीने मिरज शहर पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता पुरुष अर्भकाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. दरम्यान संबंधित पुरुष अर्भकाचा मृत्यू कशाने झाला? संबंधित अर्भकाची हत्या करून त्यास कोणी शौचालय मध्ये टाकले का? याचाही तपास आता मिरज शहर पोलिसांनी सुरू केलाय. दरम्यान या घटनेमुळे खळबळ उडाली असून मृत अर्भकाच्या मातेचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे. तसेच याप्रकरणी महापालिकेच्या प्रसूती गृहात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची ही आता चौकशी केली जाणार आहे.