Miraj Music City: मिरज संगीत नगरीत ‘म्युझिक हेरिटेज पार्क’चा आराखडा पाठवा

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे मुंबईतील बैठकीत आदेश
Miraj Music City: मिरज संगीत नगरीत ‘म्युझिक हेरिटेज पार्क’चा आराखडा पाठवा
Published on
Updated on
जालिंदर हुलवान

मिरज : सतार, वीणा, तबला यांसह अनेक तंतुवाद्यांसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक संगीतनगरी मिरजेच्या संगीत परंपरेचे जतन, संवर्धन आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्र शासनाकडून ब्रँडिंग केले जाणार आहे. त्यासाठी मिरज येथे अत्याधुनिक ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्याचे आदेश सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मंगळवारी प्रशासनाला दिले.

सांगलीच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा बैठक...

मुंबईत मंत्रालयात मंत्री शेलार यांच्या अध्यक्षतेखालील अधिकारी, लोकप्रतिनिधी व तंतुवाद्य निर्मात्यांसमवेत काल बैठक झाली. या बैठकीत या प्रकल्पाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, सांस्कृतिक कार्य विभाग, उद्योग विभाग आणि संबंधित संस्थांची संयुक्त बैठक तातडीने घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

राज्य शासनाकडून ऐतिहासिक वारसा होणार जतन...

मिरजेच्या दोनशे वर्षांहून अधिक जुन्या तंतुवाद्य निर्मिती परंपरेच्या जतनासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मिरज ही वैद्यकीय नगरीबरोबरच देशातील महत्त्वाची संगीतनगरी असून येथे सुमारे २०० हून अधिक कुटुंबे पारंपरिक हस्तकलेद्वारे सतार, तानपुरा, सूरबहार, दिलरुबा, मयुरी वीणा आदी तंतुवाद्यांची निर्मिती करतात. या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी ‘मिरज म्युझिक हेरिटेज पार्क’ उभारण्याबाबत शासन सकारात्मक आहे.

या सुविधा मिळणार...

प्रकल्पामध्ये आधुनिक तंतुवाद्य निर्मिती केंद्र, विशेष वाद्यसंग्रहालय, प्रदर्शन दालन, परफॉर्मिंग आर्टस्‌ सेंटर, संगीत इतिहासाचे दस्तावेजीकरण, संशोधन सुविधा तसेच कलाकारांसाठी प्रशिक्षण केंद्र आणि नियमित सांस्कृतिक कार्यक्रमांची व्यवस्था असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news