

मिरज : बनावट नोटांप्रकरणी अटकेत असलेल्या पाचहीजणांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी मुख्य सूत्रधार, बडतर्फ पोलिस हवालदार इब्रार इनामदार व नरेंद्र शिंदे यांना आणखी तीन दिवस कोठडी देण्यात आली, तर सुप्रीत देसाई, राहुल जाधव आणि सिद्धेश म्हात्रे या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
कोल्हापुरात बनावट नोटा छापून त्या मिरजेत आणि मुंबईत कमिशनवर वितरित करण्याचा प्रयत्न बडतर्फ हवालदार इब्रार इनामदारसह पाचजणांनी केला होता. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयाने सोमवार, दि. 13 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. यादरम्यान त्यांच्याकडे कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्यांनी हा आपला पहिलाच प्रयत्न असल्याची कबुली दिली. मात्र यापूर्वीही त्यांनी मुंबईत बनावट नोटा वितरित केल्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, अटकेत असलेल्या सर्व पाचहीजणांची कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी संशयितांकडे पुढील रॅकेटचा तपास करायचा आहे, त्यामुळे संशयितांची पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी पोलिसांनी केली. परंतु न्यायालयाने मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार आणि नरेंद्र शिंदे या दोघांना आणखी तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली, तर अन्य तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
अटकेत असणारा मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार हा अन्य काहीजणांच्या संपर्कात असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे त्यादृष्टीने तपास केला जात आहे. इब्रार याचे सीडीआर काढण्यात आले असून त्याने बनावट नोटा प्रकरणात ज्या-ज्या व्यक्तींशी संपर्क साधला, तेही आता पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले.