

मिरज : दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगली जिल्ह्याकडून आदरांजली म्हणून सांगली जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाला पहिल्या एक वर्षासाठी अध्यक्षपद द्यावे, असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मिरजेतील महायुतीच्या बैठकीत धरला.
जिल्हा परिषदेत अध्यक्ष कोण होणार आणि सत्ता कोणाची येणार? यासाठी जिल्ह्यात राजकीय खल सुरू आहे. यासंदर्भातच सोमवारी मिरजेच्या शासकीय विश्रामगृहामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी खासदार संजय पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांनी या बैठकीमध्ये आपली भूमिका मांडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील व संजय पाटील म्हणाले, अजितदादांना सांगली जिल्ह्याच्यावतीने आदरांजली वाहण्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा अध्यक्ष करावा. हा अध्यक्ष पहिल्या एक वर्ष कालावधीसाठी असेल, त्यानंतर इतर पक्षाला संधी देता येईल. दोनच दिवसात याबाबत आमच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांनाही माहिती देऊ.
यावेळी आमदार सुहास बाबर यांनी, शिवसेनेचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून याबाबतची भूमिका मांडू, असे सांगितले. त्यानुसार मंगळवारी (दि. 17) आमदार बाबर हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. महायुतीच्या निर्णयासोबत आम्ही निश्चित असू, असे जनसुराज्य शक्ती पक्षातर्फे समित कदम यांनी यावेळी स्पष्ट केले. या सर्वांच्या भूमिका ऐकल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, यासंदर्भात भाजपचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना याबाबत माहिती देऊन पुढील बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे जाहीर केले.