

मिरज ः वैद्यकीय प्रतिनिधी एकेठिकाणी बसलेला होता... तेथून बाहेर पडताच पाच नशेखोरांनी त्याला घेरले... त्याचे दुचाकीवरून अपहरण केले... अपहृताला बेदम मारहाण केली... त्याच्याकडे पैशाची मागणी केली... त्याने पैसे नाहीत असे सांगितल्यावर त्याचा मोबाईल काढून घेतला... मोबाईलवर लोन ॲप डाऊनलोड करून तत्काळ कर्ज मंजूर करून घेतले... ते स्वतःच्या नावावर ट्रान्स्फरही करून घेतले... चित्रपटात शोभावी, अशी ही घटना मिरजेत घडली.
वैद्यकीय प्रतिनिधी राजीव मार्टीन देवासीया (वय 54, रा. समतानगर, चौगुले प्लॉट) असे अपहरण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांचे 98 हजार रुपये नशेखोरांनी ऑनलाईन लंपास केले. त्यांना धारदार हत्यार व खेळण्यातील पिस्तूलचा धाक दाखवला. पोलिसांनी याप्रकरणी संशयित रितेश कुरणे, लतीफ ख्वाजा शेख, वाहिद मुल्ला, राजेश गुजराथी व साहील शेख (सर्व रा. माणिकनगर, मिरज) या पाचजणांविरुद्ध अपहरण व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी चौघांना अटक केली असून, रितेश कुरणे हा फरार आहे. अटक केलेल्या चौघांना न्यायालयाने 7 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
दोन दुचाकींवरून आलेल्या पाचजणांनी राजीव यांना सांगली रस्त्याजवळ दमदाटी केली. त्यांना दुचाकीवरून जबरदस्तीने बामणी येथे नदीजवळ नेले. तेथे दुचाकीवरून (एमएच 10 सीडी 0754) आलेल्या रितेश कुरणे याने बनावट पिस्तूलचा धाक दाखवत त्यांना मारहाण केली. राजीव यांच्याकडील मोबाईल, आधार व पॅनकार्ड लतीफ ख्वाजा शेख याच्याकडे देण्यास भाग पाडले.