

मिरज : मिरज शासकीय रुग्णालयातून पळवून नेलेल्या अर्भकाच्या अपहरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. 57 तासांनंतर अपहृत अर्भकाची तासगाव तालुक्यातील सावळज येथून सुटका करण्यात आली, तर तब्बल 60 तासांनंतर अपहृत बाळ पुन्हा आईच्या कुशीत विसावले. अर्भकाच्या अपहरणप्रकरणी सारा सायबा साठे (वय 24, सध्या रा. डोंगरसोनी रस्ता, सावळज, ता. तासगाव, मूळ रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) हिला अटक करण्यात आली आहे. तिच्यासह पती सायबा साठे यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, मिरज शासकीय रुग्णालयातून शनिवार, दि. 3 मे रोजी सकाळी 10 च्या सुमारास सारा साठे या महिलेने कविता समाधान आलदर या महिलेचे तीन दिवसाचे बाळ डोस देण्याच्या बहाण्याने पळवून नेले होते. अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान, सारा साठे ही घटनेच्या तीन दिवस आधीपासून रुग्णालय आवारात रेकी करीत असल्याची माहिती समोर आली. अपहरण करण्यासाठी कोणते बाळ सोयीचे आहे, याची चाचपणीदेखील तिने केली होती. तसेच प्रसूतिगृहात असणार्या महिलेच्या शेजारी कोणी नातेवाईक असतात का, कोणत्या महिलेजवळ नातेवाईक नसतात, याचीदेखील तिने रेकी केली होती.
कविता आलदार या महिलेजवळ नातेवाईकांची वर्दळ नसते, हे तिने हेरले. कोणाला संशय येऊ नये, यासाठी त्या ठिकाणी असणार्या सर्वांशी ती मिळून-मिसळून वागत होती. कविता आलदार हिच्या बाळाचे अपहरण करण्याचा प्लॅन तिने आखला. ठरल्याप्रमाणे शनिवार, दि. 3 मेरोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कविता हिच्याजवळ कोणी नातेवाईक नसल्याचे हेरून तिने कविता हिला ‘तुमच्या बाळाला डोस द्यायचा आहे’, असे सांगितले. त्यानंतर ती कविता हिच्याकडून बाळ घेऊन गेली. त्यानंतर रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांची नजर चुकविण्यासाठी तिने अपहरण केलेल्या अर्भकाला एका बॅगमध्ये घातले. त्यानंतर रुग्णालयातून पळ काढला. रुग्णालयाबाहेर असणार्या एका रिक्षातून तिने थेट अंकली (ता. मिरज) गाठली. तेथे रिक्षातून उतरून तिने बाळासाठी दूध पावडर आणि दुधाची बाटलीदेखील घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले. परंतु तिने अपहरण करीत असताना मोबाईलचा वापर केला नव्हता. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी निर्माण झाल्या. दरम्यान, पोलिसांनी सारा साठे हिचा सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झालेला फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल केला, तसेच ही महिला कोठे मिळून आली, तर पोलिसांशी संपर्क साधण्याचेदेखील आवाहन केले होते.
अपहरण करणार्या महिलेने गुुंगारा दिल्याचे लक्षात येताच पोलिसांनी उलट दिशेने तपास सुरू केला. अपहरण झालेल्या तीन दिवस आधीपासूनचे जिल्हाभरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली होती. यावेळी सारा साठे ही सावळज बसमधून मिरजेत उतरत असतानाचे सीसीटीव्ही चित्रण समोर आले. त्यानंतर सावळज बस स्थानकातील सीसीटीव्हीची तपासणी करण्यात आली. सावळजमध्येही संशयित महिला सीसीटीव्हीत चित्रीत झाली होती. त्यामुळे ती याच भागात असल्याची पोलिसांची खात्री झाली. यादृष्टीने तपास सुरू असतानाच सोमवारी दुपारी सावळजमधून एका व्यक्तीने संशयित महिला सावळजमध्येच असून तिच्याकडे बाळ असल्याची खात्रीशीर माहिती महात्मा गांधी चौक पोलिसांना दिली. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलिसांचे एक पथक तत्काळ सावळजकडे रवाना झाले. यावेळी सारा साठे हिच्या घरावर छापा टाकून तपासणी केली असता तिच्याकडे अपहरण झालेले बाळ मिळून आले. तिला पोलिसी खाक्या दाखवतच तिने बाळ चोरल्याची कबुली दिली.
बाळाला ताब्यात घेऊन मिरजेत आणण्यात आले. त्याची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बाळाची प्रकृती चांगली असल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी दिल्यानंतर प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर यांनी अपहृत अर्भक आईकडे सुपूर्द केले. तब्बल 57 तासानंतर अर्भकाच्या अपहरणाचा छडा लावण्यात यश आल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. दरम्यान, या तपासामध्ये प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक नितीन सावंत, जयदीप कळेकर, पंकज पवार, सुनील गिड्डे, उपनिरीक्षक संदीप गुरव, रूपाली गायकवाड यांनी, तर सायबर पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक रूपाली बोरडे यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
सारा हिचा मिरज शासकीय रुग्णालयात दीड महिन्यापूर्वी गर्भपात झाला होता. याच रुग्णालयात ती दाखल होती. इतरांना मुलगा झाला, मला नाही झाला, याची सल तिच्या मनात होती. तसेच प्रसूतिगृहातील अनागोंदी कारभार तिने पाहिला होता. त्यामुळे येथून बाळ चोरीचा प्लॅन तिने आखला होता.
अर्भकाचे अपहरण करून सारा कोठे गेली, याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तिचा उलटा व पारंपरिक तपास सुरू केला होता. यावेळी सारा कोठून आली, याचा तपास करण्यात येत होता, तसेच तिचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्यात आले. तिच्याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले होते. पोलिसांच्या या उलट्या व पारंपरिक तपासाला यश आले.
पोलिस अधीक्षक संदीप घुगे सध्या हैदराबाद येथे ट्रेनिंगमध्ये आहेत. घटनेपासून ते पोलिस अधिकार्यांच्या संपर्कात होते. बाळ कविता यांच्याकडे सुपूर्त केल्यानंतर पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी कविता हिच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. येथून पुढे बाळाची काळजी घेण्याचे आवाहन केले.
सारा साठे हिचा प्रेमविवाह झाला होता. तिला तीन मुलीच आहेत. गेल्या महिन्यात तिचा गर्भपात झाला होता. परंतु तिला वंशाचा दिवा हवा होता. त्यामुळे तिने या अर्भकाची चोरी केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्याहस्ते अपहरण झालेल्या बाळाला कविता आलदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तब्बल 60 तासानंतर बाळाला पाहताच बाळंतीण कविता हिच्यासह तिच्या नातेवाईकांच्या भावनांचा बांध फुटला. यावेळी प्रभारी पोलिस अधीक्षक रितू खोखर, उपअधीक्षक प्रणिल गिल्डा यांच्यासह डॉक्टरदेखील भावूक झाले होते.