

मिरज : गोव्यातून मिरजमार्गे अवैध वाहतूक होणारी लाखो रुपयांची गोवा बनावट दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (एक्साइज) पथकाने जप्त केली. या कारवाईत दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असले तरी, त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले. मात्र, या संपूर्ण कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रचंड गोपनीयता बाळगल्याने आणि अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात दारूचे दर वाढल्याने गोव्यातून स्वस्त असणाऱ्या गोवा बनावटीच्या दारूची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवैध तस्करी केली जाते. मिरज परिसरातून गोवा बनावटीच्या दारूची मोठी वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचला. मिरजेच्या ग्रामीण हद्दीत गोवा मेड दारूच्या बाटल्यांनी भरलेला टेम्पो अडवून तपासणी केली असता, त्यात दारूचा मोठा साठा आढळून आला.
या कारवाईत दारूबंदी असलेल्या जिल्ह्यातील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहनासह लाखो रुपयांची दारू जप्त करण्यात आली. या मोठ्या कारवाईसाठी सांगली जिल्ह्यातील जत व वाळवा तालुक्यातील अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलणे व संदेशाला उत्तर देणे टाळले.
दारू कोणी दिली अन् कुठे जाणार होती?
मिरजेत पकडण्यात आलेली लाखो रुपयांची गोवा बनावटीची विदेशी दारू गोव्यातून कोणी उपलब्ध करून दिली आणि ती महाराष्ट्रात नक्की कोणाला पुरवली जाणार होती? याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, याचा तपास पोलिसांनी केला का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.