

मिरज : शहरातील शनिवार पेठ परिसरात सुरू असणाऱ्या गॅस रिफिलिंग अड्ड्यावर मिरज शहर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत शब्बीर मेहबूब इनामदार (वय 43, रा. शनिवार पेठ, मिरज) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून 9 हजार 200 रुपयांचे साहित्य जप्त केले.
शब्बीर इनामदार हा शनिवार पेठमधील भरवस्तीमध्ये गॅस रिफिलिंगचा अड्डा चालवित होता. शब्बीर याने घरगुती गॅस सिलिंडरचा मोठा साठा करून ठेवला होता. त्यातून घरगुती गॅसबत्ती, छोटी गॅस टाकी आणि रिक्षामध्ये एलपीजी गॅस भरला जात होता. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. त्याच्याकडून घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शहरात अनेक ठिकाणी गॅस रिफिलिंगचे अड्डे असून त्यावरही कारवाई केली जावी, अशी मागणी केली जात आहे.